कोल्हापूर : कोल्हापूरकरांचा थोरला दवाखाना असलेले छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल डेंग्यूच्या विळख्यात अडकत आहे. हॉस्पिटलच्या आवारातील रस्त्यांवर सर्वत्र कोपर्या कोपर्याला साठलेली पाण्याची डबकी डेंग्यूसाठी ‘हायरिस्क झोन’ असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या एका अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.
पावसाळ्यात नेहमीच डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होते. सीपीआरमध्ये दररोज उपचारासाठी येणार्या हजारो रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णांना जीवनदान देणार्या रुग्णालयाच्या आवारातच डेंग्यूचा धोका असेल, तर इतर ठिकाणांचा विचार न केलेलाच बरा. दूधगंगा, वेदगंगा इमारतींच्या खाली व आयसीयूकडे जाणारा मार्ग अस्वच्छ आणि दलदलीत अडकला आहे. येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असते. परिणामी, येथे डासांची उत्पत्ती वाढते. सीपीआर प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. संपूर्ण रुग्णालय परिसराची स्वच्छता करणे, डासनाशक फवारणी नियमित आणि प्रभावीपणे करणे, तसेच पाणी साचू शकणार्या जागा त्वरित कोरड्या करणे आवश्यक आहे. यासोबतच, रुग्णालयात येणार्या प्रत्येकाला डेंग्यूची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय आणि धोका याबाबत माहिती देऊन जनजागृती मोहीम राबवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
सीपीआर रुग्णालयाच्या परिसराचे नूतनीकरण व डागडुजी सुरू आहे. आवारात सर्वत्र मोठ्या प्रमाणात राडारोडा पसरला आहे. यामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. या डबक्यांमध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्याची भीती आहे. परिणामी, या परिस्थितीत डासांचा डंख केवळ उपचारासाठी दाखल होत असलेल्या रुग्णांपुरताच मर्यादित नसून, त्यांना भेटायला येणारे हजारो नातेवाईक आणि रुग्णालयात अहोरात्र सेवा देणारे शेकडो कर्मचारी, परिचारिका व डॉक्टर्सदेखील डेंग्यूच्या धोक्याखाली आले आहेत.
सरकारी रुग्णालये, शाळा, कॉलेजमध्ये पावसाळ्यात विशेष लक्ष देण्याची गरज आहे. येथे काम करणार्या कर्मचार्यांसह विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी. आठवड्यातून एकदा परिसरातील अडगळीच्या ठिकाणांची पाहणी करून डासांच्या अळ्या निदर्शनास आल्यास हिवताप विभागास संपर्क साधावा.डॉ. विनोद मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी