कोल्हापूर ः केंद्र सरकारकडून राज्य सरकारला देण्यात आलेल्या आणि पी. एम. केअर योजनेसह अन्य निधीतून खरेदी केलेली सीपीआरमधील 144 पैकी 70 व्हेंटिलेटर चालू आहेत, तर 74 बंद आहेत. त्यापैकी 17 व्हेंटिलेटर दुरुस्तच करता येणार नाहीत, अशी आहेत. व्हेंटिलेटरसाठी दररोज 4 ते 5 रुग्णांना वेटिंग करावे लागत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना वेळेत व्हेंटिलेटर मिळत नाही. त्यामुळे रुग्णांना खासगीत जाऊन उपचार घ्यावे लागत आहेत. 74 व्हेंटिलेटर बंद पडेपर्यंत सीपीआर प्रशासन काय करत होते, असा संतप्त सवाल रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमधून उपस्थित केला जात आहे. सध्या सीपीआर सुमारे 30 ते 40 नवीन व्हेंटिलेटरची गरज आहे.
सीपीआरला कोरोना काळात केंद्र व राज्य शासनाकडून 70 कोटी रुपयांची उपचारपूरक साधने आली. त्यामध्ये व्हेंटिलेटर प्राप्त झाली. रुग्णालयातील 400 बेडना ऑक्सिजन थेट पुरवठा होईल, असा प्रकल्प सीपीआर येथे तयार केला आहे. पण अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटर अत्यंत महत्त्वाचे आहे. उपचाराची चांगली सोय यामुळे दिवसेंदिवस येथे उपचार घेणार्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी आधारवड असणार्या सीपीआरमध्ये व्हेंटिलेटरसाठी मात्र रुग्णांना वेटिंगवर थांबावे लागत आहे.
सध्या सीपीआर येथील मेडिकल आयसीयू, ट्रॉमा आयसीयू वेदगंगा, कार्डियाक आयसीयू, नवजात शिशू व अतिदक्षता विभाग, पीआसीयू कोयना इमारत, अपघात विभाग, लोअर कोरोना विभाग येथील 70 व्हेंटिलेटर चालू आहेत. एका नामांकित कंपनीकडून व्हेंटिलेटरची खेरदी करण्यात आली आहे. त्याची दुरुस्ती का होत नाही. हा मात्र चर्चेचा विषय आहे. नवीन व्हेंटिलेटर खरेदी प्रक्रिया असेल तर प्रशासन गतीने कामाला लागते, मग बंद पडलेली व्हेंटिलेटर दुरुस्तीसाठी प्रशासनाला ‘इंटरेस’ का नाही? याची चर्चा सीपीआरमध्ये सुरू आहे. व्हेंटिलेटर वेळेत दुरस्ती झाली तर गंभीर रुग्णांना जीवदान देणारे ठरणार आहे.
तज्ज्ञ, अनुभवी डॉक्टरांमुळे सीपीआरच्या लौकिकात भर पडली आहे. साधा खोकला, सर्दी जरी आली तरी अनेक रुग्ण सीपीआर येथे उपचारासाठी दाखल होतात. इतका द़ृढ विश्वास येथील डॉक्टरांवर आहे; पण येथील वैद्यकीय उपकरणे मात्र, दर्जेदार नसल्याचे दिसून येते. तज्ज्ञ डॉक्टरांना ज्या पद्धतीची उपकरणे हवी आहेत, त्या पद्धतीने प्रशासनाकडून ‘इंटरेस’ न दाखविता उपलब्ध करून दिली तरच सीपीआरचा लौकिक कायम राहणार आहे.
सीपीआर वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारित येते. येथे दररोज सुमारे 1400 ते 1500 बाह्य रुग्णांची नोंदणी येथे होते. 150 ते 200 रुग्णांना पुढील उपचारासाठी दाखल केले जाते. अशीच जबाबदारी सर्वजनिक आरोग्य विभागाने स्वीकारली पाहिजे. कुत्रं चावलं तरी जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून रुग्णांना सीपीआरकडे पिटाळले जाते. ग्रामीण रुग्णालये, उप जिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि महापालिका आरोग्य विभागाने गांभीर्याने घेऊन रुग्णांना येथेच उपचार द्यावेत. त्यामुळेच सीपीआरवरील लोड कमी होईल.