पन्हाळा : अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी शाळकरी मुलांची ने-आण करणाऱ्या मारुती ओमनीचा चालक राहुल अशोक भोसले (३७, रा. पन्हाळा) याला कोल्हापूर सत्र न्यायालयाने दोषी ठरविले. त्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी हा निकाल दिला.
ही घटना २७ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी राक्षी ते धबधबेवाडी दरम्यान घडली होती. आरोपीने शाळकरी बालिकेला मारुती ओम्नी कारमध्ये बसवून वीटभट्टीजवळ तिच्याशी अश्लील कृत्य केले होते. या घटनेनंतर घाबरलेल्या बालिकेने शाळेत जाण्यास नकार दिला. आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील अॅड. मंजुषा बी. पाटील यांनी सरकारच्या वतीने नऊ साक्षीदार तपासले. यामध्ये पीडित बालिका, तिची आई आणि शिक्षिकेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, तसेच बीएनएस कलम ३५१(२) अंतर्गत एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून सात हजार रुपये पीडित बालिकेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
शाळेत जाण्यास नकार देणाऱ्या घाबरलेल्या मुलीला आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यामुळे आरोपीचा प्रकार उघडकीस आला. आईच्या तत्परतेमुळे पोलिसांत तातडीने गुन्हा दाखल झाला. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक महेश कोंडूभैरी यांनी जलद तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात पीडिता, तिची आई आणि शिक्षिकेची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली.