कोर्ट परिसरात महिला वकिलास मारहाण 
कोल्हापूर

Kolhapur News : कोर्ट परिसरात महिला वकिलास मारहाण

पोलिसांसमोरच प्रकार : तीन महिला वकिलांनाही धक्काबुक्की; संतप्त वकिलांचा चार तास ठिय्या

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुल परिसरात एका महिलेने महिला वकिलास पोलिसांसमोरच मारहाण केली. शनिवारी सायंकाळी घडलेल्या घटनेचे तीव पडसाद उमटले. संतप्त वकिलांनी चार तासांहून अधिक काळ ठिय्या आंदोलन केले. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरम्यान, मध्यस्थी करणाऱ्या तीन महिला वकिलांनाही संशयित महिलेने धक्काबुक्की केली. रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिला वकिलांची धामधूम सुरू असतानाच महिला वकिलास मारहाण झाल्याने कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील यांच्यासह 500 हून अधिक महिला वकिलांनी संशयित महिलेला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. पोलिसांनी खबरदारी म्हणून संशयितेला हिरकणी कक्षात हलविले.पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके यांच्यासह शाहूपुरी, पोलिस नियंत्रण कक्षातील राखीव दलाचा फौजफाटा पाचारण केला. अखेर ज्येष्ठ विधिज्ञांसह वकिलांची रात्री उशिरा जिल्हा न्यायालय परिसरात बैठक होऊन मारहाणीचा निषेध केला.

कौटुंबिक वादाच्या तारखेसाठी पन्हाळा तालुक्यातील दाम्पत्य न्यायालयात आले होते. पुढील तारीख मिळाल्यानंतर ते बाहेर पडले. काही अंतरावर त्यांच्यात वादावादी सुरू झाली. पत्नी पतीच्या अंगावर धावून गेली. पतीचे वकीलपत्र घेतलेल्या महिला वकिलांनी दाम्पत्याला समजावण्याचा प्रयत्न केला. कोर्ट आवार आहे, वादावादी करू नका, असा सल्ला देताच संशयित महिला आक्रमक झाली. तिने महिला वकिलाच्या श्रीमुखात लगावली. त्यानंतरही मारहाण सुरूच होती. अनपेक्षितपणे घटनेने वकील भेदरल्या. त्या अधिकारी, पोलिसांना हा प्रकार सांगत असताना संशयित महिलेने पोलिसांच्या समोरही मारहाण केली. अन्य महिला वकिलांनी त्यांची सुटका केली. धक्का बसलेल्या वकिलाची प्रकृती बिघडली. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केलेे. रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नाही.

वकीलपत्र न स्वीकारण्याचा निर्णय

जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. व्ही. आर. पाटील. सर्जेराव खोत, विवेक घाटगे, गिरीश नाईक, राजेंद्र मंडलिक, मनीषा सातपुते, वैष्णवी कुलकर्णी, विजय ताटे-देशमुख, प्रमोद दाभाडे, पूजा देशमुख यांच्यासह संतप्त वकिलांनी या घटनेचा निषेध करून संशयित महिलेचे वकीलपत्र कोणीही स्वीकारू नये, असे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT