कोल्हापूर : जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतीची रविवारी (दि. 21) मतमोजणी होणार आहे. तासाभरातच विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. यानंतर अवघ्या तासाभरातच सकाळी 11पर्यंत सर्व निकाल हाती येणार आहे.
जिल्ह्यात मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. ऑनलाईन बैठकीतून राज्य निवडणूक आयोगामार्फत तयारीबाबत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि 3 नगर पंचायतींसाठी 318 मतदान केंद्रांवर 2 डिसेंबरला ईर्ष्येने मतदान झाले होते. या निवडणुकांची मतमोजणी संबंधित 13 नगरपालिका ठिकाणी होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 790 अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती केली आहे. सकाळी 10 वा. मतमोजणीला प्रारंभ होईल. हुपरी, कागल, गडहिंग्लज आणि जयसिंगपूर या नगर परिषद वगळता अन्य सर्व ठिकाणी अवघ्या अर्ध्या तासात मतमोजणी पूर्ण होईल. या चार ठिकाणी पाऊण तास ते तासाभरात निकाल स्पष्ट होणार आहे. मतमोजणीच्या दोन ते सात फेर्या होणार आहेत. यासाठी सर्व नियुक्त कर्मचार्यांचे दोन प्रशिक्षण सत्र पूर्ण झाले असून तिसरे प्रशिक्षण सुरू आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले, फेरीनिहाय निकाल जाहीर करण्यासाठी लाऊडस्पीकरसह इतर सोयींची व्यवस्था करण्यात आली आहे. माध्यम कक्षाचीही व्यवस्था करण्यात आली असून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. आवश्यक साहित्य त्या त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सर्व मतमोजणी केंद्रांवर चोख नियोजन केले आहे. सर्व ईव्हीएमची सुरक्षितता, सुरक्षा आणि स्ट्राँग रूमबाबत आवश्यक काळजी घ्या, अशी सूचनाही त्यांनी केली. याबाबतची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना ही माहिती देण्यात आली.
पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना, तडीपार, समन्स, वॉरंट आणि गुन्ह्यांबाबत माहिती दिली. कोल्हापूरसह इचलकरंजी नियंत्रण कक्षामार्फत सर्व ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व 13 स्ट्राँग रूम ठिकाणी सशस्त्र एसआरपीएफचे जवान तसेच 3 आर्मगार्ड तैनात करण्यात आले आहेत. बंदोबस्तासाठी 8 पोलिस उपविभागीय अधिकारी, 12 पोलिस निरीक्षक, 55 सहायक पोलिस निरीक्षक, 463 पोलिस अंमलदार आणि 800 होमगार्ड नेमण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस सहआयुक्त नगर प्रशासन नागेंद्र मुतकेकर यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.
विजयी मिरवणुका काढण्यावर बंदी
निकालानंतर काढण्यात येणार्या विजयी मिरवणुकांना बंदी आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे अमलात आणावी. कुठेही मिरवणुका, रॅली निघणार नाहीत याची दक्षता घ्या, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.
गडहिंग्लजच्या एका प्रभागासाठी उद्या मतदान
गडहिंग्लज येथील प्रभाग क्रमांक 3 अ येथे निवडणूक 20 डिसेंबर रोजी होणार आहे. यासाठी 2479 मतदारांसाठी 3 मतदान केंद्रांवर मतदान होईल. त्याचीही 21 रोजी एकत्र मतमोजणी होईल.
मतमोजणीसाठी एकूण टेबल व कंसात मतमोजणी फेर्या:
जयसिंगपूर 13 (5), मुरगूड 6 (2), मलकापूर 5 (2), वडगाव 10 (3), गडहिंग्लज 11 (4), कागल 6 (7), पन्हाळा 5 (2), कुरुंदवाड 10 (3), हुपरी 5 (7), शिरोळ 11 (3), आजरा 10 (2), चंदगड 9 (2) आणि हातकणंगले 7 (3).
राज्यात सर्वाधिक मतदान जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये; आयोगाकडून अभिनंदन
जिल्ह्यात एकूण 78.87 टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये मुरगूड 88.43 टक्के, मलकापूर 86.99 टक्के आणि वडगाव 86.24 टक्के या नगर परिषदा राज्यात मतदान टक्केवारीत पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत. या अनुषंगाने मतदार जनजागृती आणि मतदान प्रक्रिया प्रभावीपणे राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता तसेच सर्व संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या टीमचे विशेष अभिनंदन राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी बैठकीत केले.