शिरढोण : शिरढोण-कुरुंदवाड रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान येथील हॉटेल मेजवानी जवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र या कामावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्ते सुरेश सासणे व विश्वास बालीघाटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरले. प्रश्नांची सरबत्ती करत कामाबाबत गंभीर आरोप केले. मात्र अधिकाऱ्यांनी अंदाजपत्रकाप्रमाणे काम सुरू असून आपल्या पातळीवर आवश्यक दुरुस्ती करून काम करण्याची हमी दिल्याने आंदोलक शांत झाले.
शिरढोण-कुरुंदवाड रस्त्याचे रुंदीकरणाचे काम निधीअभावी वर्षभरापासून रखडले होते. दोन दिवसांपूर्वी या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र शिरढोण-कुरुंदवाड मार्गावर एक किमी रस्ता उंचीवर आहे. दोन्ही बाजूला जवळपास १५ फूटाहून अधिक खोलगट भाग आहे. त्यामुळे याठिकाणी संरक्षक भिंत बांधणे आवश्यक आहे. मात्र बांधण्यात येणारे संरक्षक भिंतीचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असून या कामात सळईचा वापर होत नाही. केवळ सिमेंट खडी वाळूचा वापर करून भिंत उभी करण्यात येत असल्याने सुरेश सासणे व विश्वास बालीघाटे यांनी विरोध करत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. या कामात सळईचा वापर करण्याची त्यांनी मागणी केली होती मात्र अंदाजपत्रकाप्रमाणे काम सुरू असून या कामाचा सर्व्हे पुणे बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आला असून यामध्ये आपण आपल्या पातळीवर संरक्षक भिंतीची दीड मीटरने उंची वाढवून घेण्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने आंदोलनकर्ते शांत झाले. यावेळी प्रवीण दानोळे,दिलीप पाटील,सुरेश हणबर, महावीर नारगुडे,ओमेश सनबे,विजय मगदूम यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर रस्त्याच्या मजबुतीकरणा बाबत आमच्या विभागामार्फत सर्व प्रयत्न सुरू आहेत.मात्र या कामाचे अंदाजपत्रक व सर्व्हे पुणे विभागाकडून करण्यात आले आहे.त्यामुळे स्थानिक पातळीवर आणि आमच्या अधिकारात जेवढं शक्य आहे तेवढे दुरुस्ती करून रस्त्याच्या मजबुतीकरणाला प्राधान्य देऊ तसेच शेतकरी नागरिकांना विश्वासात घेऊनच काम पूर्ण करू.-अनंत सूर्यवंशी , सहायक शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जयसिंगपूर.