कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शनिवार पेठेतील प्राचीन खोलखंडोबा शनी मंदिर परिसरात सुरू असलेले इमारत बांधकाम पुढील आदेश येईपर्यंत स्थगित करावे, असे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मुंबई येथे बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत हा निर्णय घेण्यात आला.
खोलखंडोबा मंदिराच्या बाजूने हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र करंबे यांनी भूमिका मांडली. संबंधित जागेचे एकत्रीकरण करताना कोल्हापूर धर्मादाय आयुक्तांची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नाही, असे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दोन महिन्यांपूर्वी सादर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली.
या बांधकामासंदर्भात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. एकत्रीकरणाला धर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांनी परवानगी दिलेली नाही, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांनी दिला आहे. मग, या बांधकामाला महानगरपालिकेने परवानगी दिलीच कशी? ही बांधकाम परवानगीच बेकायदेशीर आहे, असा आरोप खोलखंडोबा मंदिर बचाव समितीने केला आहे. त्यातही महानगरपालिकेने केवळ तीन मजल्यांच्या इमारतीस परवानगी दिली असताना प्रत्यक्षात सात ते आठ मजले उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यासंदर्भात महानगरपालिकेकडे तातडीने कारवाईची मागणी करणार असल्याचे खोलखंडोबा मंदिर बचाव समितीने सांगितले.