कोल्हापूर: कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाची पकड असणारे 'गोकुळ' दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील (आबाजी) हे शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा सुरुंग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (शनिवारी) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान आयोजित एका विशेष कार्यक्रमात विश्वास पाटील आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. गेल्या काही दिवसांपासून पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चा रंगल्या होत्या, त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
विश्वास पाटील यांचा हा निर्णय केवळ राजकीय नसून त्याचे पडसाद सहकार क्षेत्रातही उमटणार आहेत. 'गोकुळ' दूध संघाच्या राजकारणावर विश्वास पाटील यांची मोठी पकड आहे. त्यांनी घेतलेल्या या 'यु-टर्न'मुळे गोकुळमधील सत्तेच्या समीकरणांवर मोठा परिणाम होणार असून, विरोधी गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात काँग्रेसची ताकद असलेल्या भागात विश्वास पाटील यांचा मोठा प्रभाव आहे. मात्र, त्यांनी आता मुख्यमंत्र्यांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.