रुकडी : नागपूरच्या आयआयटीच्या वसतिगृहातील ती पहाट इतर दिवसांसारखी सुरू झाली. परंतु काही तासांत सगळं काही बदलून गेलं. रुकडी (ता. हातकणंगले) येथील श्रेयस चंद्रकांत माने याने नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. संगणक अभियंता बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याच्या जाण्याने आई-वडिलांचे स्वप्न अधुरेच राहिले.
श्रेयसचे वडील खासगी कंपनीत कामाला तर आई गारमेंटमध्ये मजुरी करून संसार चालवते. घरची हलाखीची परिस्थिती असूनही मुलाला कॉम्प्युटर इंजिनिअर बनविण्यासाठी वडिलांनी कर्ज काढले. लहानपणापासूनच तो हुशार होता. शालेय शिक्षण रुकडीत झाले. बारावीत 86 टक्के गुण मिळवत त्याने नागपूर येथील आयआयटी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला.
4 मे रोजी पहाटे कॉलेज प्रशासनाकडून त्याच्या आत्महत्येची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. तातडीने त्याचे वडील नागपूरला रवाना झाले. श्रेयसच्या आत्महत्येस कॉलेज प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. अपघात झाल्यानंतर त्याला दवाखान्यात का दाखल केले नाही? या प्रकरणाची चौकशी होऊन मुलाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. श्रेयस वारंवार लेक्चर चुकवत होता, त्याची मानसिक स्थिती काही दिवसांपासून व्यवस्थित नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. श्रेयसच्या जाण्याने केवळ एक कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण रुकडी गावातून हळहळ व्यक्त होत आहे
ट्रीपल आयटी व्यवस्थापनावर विद्यार्थ्यांचा रोष
श्रेयस माने या विद्यार्थ्याचा मृतदेह सकाळी साडेचार ते बारा वाजेपर्यंत वसतिगृह आवारातच पडून होता. किमान हजार विद्यार्थी असलेल्या वसतिगृहात साधी रुग्णवाहिका नाही. वॉर्डनने देखील ही घटना गांभीर्याने घेतली नाही. बुटीबोरी आणि नागपूरपासून जवळपास 20 किलोमीटर अंतराच्या या घटनास्थळी तातडीने रुग्णालयात उपचार मिळाले असते तर श्रेयस बचावला असता, अशा भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. सकाळची ही घटना असताना प्रभारी संचालक डॉ. प्रेमलाल पटेल सायंकाळी 6 वाजता वसतिगृह परिसरात आल्याबाबत देखील काहींची नाराजी कानी पडली. एकंदरीत आता श्रेयसच्या मृत्यूने अनेक अनुत्तरित प्रश्न पुढे येऊ लागले आहेत. बुटीबोरी पोलिस पोलिस तपासात वेगवेगळे पैलू शोधत आहेत.