कोल्हापूर : कोल्हापूर शहरात वाढत्या वाहतुकीच्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अतिक्रमण हटविणे, नवीन पार्किंगची सोय करणे, झेब्रा क्रॉसिंग, रोड मार्किंग, ट्रॅफिक वॉर्डन नियुक्ती, विविध दिशादर्शक फलक अशा विविध उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी शहरात रहदारी सुरळीत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना हाती घेण्याचे निर्देशही दिले. यावेळी महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्यासह परिवहन, वाहतूक विभाग, महापालिका, सार्वजनिक बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांवरील स्टँड बोर्ड, छपरी, पायर्या, दुकानांपुढील अतिक्रमण तत्काळ काढावे. झेब्रा क्रॉसिंग व रोड साईड पट्टे स्पष्ट करावेत. सिग्नल चौकांवर दिशादर्शक व माहिती फलक लावावेत. शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सुट्टीच्या काळात मेन राजाराम हायस्कूल, पेटाळा मैदान, प्रायव्हेट हायस्कूल मैदान व खराडे महाविद्यालय या ठिकाणी ‘पे अँड पार्क’ तत्त्वावर खासगी पार्किंग सुरू करण्याच्या सूचना दिल्या. याबाबत शाळांशी बोलून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. दुकानदारांनी आपली व कामगारांची वाहने इतरत्र पार्क करून ग्राहकांच्या वाहनांसाठी जागा सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करून द्यावी.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रंकाळा रोड साईड पांढरे पट्टे मारणे, पान लाईन, चप्पल लाईन ते पापाची तिकटी ते गंगावेस ते रंकाळा स्टँड ते रंकाळा टॉवर तसेच बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक नो थांबा करणे, रंकाळा टॉवर ते डी मार्ट यादरम्यान रस्त्याच्या बाजूचा वॉकिंग ट्रॅकचे खांब काढून त्याठिकाणी दुचाकी व चारचाकी पार्किंग करणे शक्य आहे का? यावर बैठकीत चर्चा झाली. महाद्वार रोड व ताराबाई रोड अतिक्रमण, रोड साईड मार्किंग, ताराबाई रोड पी-1, पी-2 पार्किंग इत्यादीबाबत नियोजन करण्यात आले. भवानी मंडपमधील अतिक्रमण व वाहने काढणे, पर्यटकांच्या वाहनाकरिता भवानी मंडप कमानीजवळ ड्रॉपिंग पॉईट करणे यावर चर्चा झाली.
ट्रॅव्हल्स बसेस दाभोळकर सिग्नल ते ताराराणी सिग्नल चौक या मार्गावर पिकअपसाठी थांबतात. त्यामुळे सायंकाळी वाहतूक कोंडी होते. ट्रॅव्हल्स बसेससाठी कावळा नाका पाण्याच्या टाकीजवळ पार्किंग सुविधा कराव्यात. तावडे हॉटेल येथील बस स्टॉपची जागा बदलणे. तावडे हॉटेल येथे रस्त्याची दुरुस्ती करणे. सासने मैदान ते आदित्य कॉर्नर पी-1, पी-2 पार्किंग व्यवस्था करणे, या सर्व उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता येईल. याबाबत येत्या आठ दिवसांत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी केल्या.