कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड. यावेळी उपस्थित पोलिस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव आदी. 
कोल्हापूर

Kolhapur News| गुन्हेगारांवर जरब बसवा; हद्दपार, तडीपारीची प्रकरणे तत्काळ निकाली काढा

जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड; महसूल-पोलिस समन्वय आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आगामी काळात गणेशोत्‍सव, दसरा, दीपावली अशा सण-उत्सव काळात जिल्ह्यात कायदा आणि सुव्यस्था सुरळीत राहावी, सण- उत्सव शांततेत व आनंदी वातारणात पार पडावेत यासाठी गुन्हेगारांवर जरब बसवा, त्याकरीता कायद्याची प्रभावी अमंलबजावणी करा. हद्दपार, तडीपारीची प्रकरणे तत्काळ निकाली काढा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी मंगळवारी महसूल आणि पोलिस विभागाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल व पोलिस प्रशासन समन्वय आढावा बैठक झाली. डॉ. राठोड म्हणाले, कायदा व सुव्यवस्था ही पोलिस व महसूल विभागाची जबाबदारी असून दोन्ही विभागांनी समन्वयाने गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबाजवणी करा. टोळ्या किंवा समूह यांची हद्दपार, तडीपारची कारवाईची प्रकरणे तातडीने मार्गी लावा. त्याचा दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाईल.

प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार यांनी गुन्ह्यांची संख्या कमी होण्यासाठी समन्वयाने काम करावे. प्रलंबित चॅप्टर केसेस मार्गी लावा, असे सांगत डॉ. राठोड म्हणाले, एमपीआयडी अंतर्गत कारवाईत न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा. गुन्हेगारीबाबत पोलिसांकडून महसूलकडे परिपूर्ण प्रस्ताव द्या. सर्व सण उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी प्रत्येकांनी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडा.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, येत्या गणेशोत्सवासह महत्त्वाच्या सणात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाचे २४ तास काम सुरू राहणार आहे. त्यातून तातडीची मदत केली जाईल. विविध नियंत्रण समित्यांचीही स्थापना केली आहे. गुन्ह्यांची प्रलंबितता वाढू नये यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर केले जात आहेत. मान्यतेनंतर पोलिस प्रशासन तातडीने तडीपार, हद्दपारीची प्रकरणे निकाली काढली जात आहे.

शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी कायदा व सुवस्था संदर्भात संगणकीय सादरीकरण केले. बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, सर्व प्रांताधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, सर्व पोलिस स्थानकांचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT