कोल्हापूर : बिंदू चौक ते मेन राजाराम हायस्कूल या मार्गावर पार्किंग उभारणीचा विचार आहे. त्याबाबत नागरिक, व्यापाऱ्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी आवश्यक भूसंपादनासाठी दहा-पंधरा दिवसांत मिळकतींचे प्रत्यक्ष सर्वेक्षण केले जाईल. त्याबरोबर संबंधित मिळकतधारकांशी चर्चाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनासाठी राज्याच्या वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीच्या बैठकीत भूसंपादनाच्या विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार ज्यांना पुनर्वसन हवे आहे त्यांचे पुनर्वसन आणि ज्यांना मोबदला हवा आहे त्यांना मोबदला याबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीचे इतिवृत्त मंजूर झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रियेला वेग येईल, असे येडगे यांनी सांगितले. त्यानुसार संबंधित मिळकतधारकांशी संवाद साधला जाणार आहे.
आराखडा कसा राबवायचा, त्यानुसार भूसंपादन कोणत्या बाजूला करायचे याबाबतही निर्णय होईल. त्याकरिता प्रत्यक्ष मिळकतींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यापूर्वीच्या दर्शन रांगेची जागा बदलण्यात येईल, अशीही शक्यता आहे. यामुळे पूर्व दरवाजाकडून दर्शन रांग उभारता येईल, त्यादृष्टीनेही विचार सुरू आहे. या बाजूला दर्शन मंडप झाल्यास बिंदू चौक ते मेन राजाराम हायस्कूल या मार्गावर पार्किंग सुविधा करण्याचा विचार असल्याचे येडगे यांनी सांगितले. बिंदू चौक ते मेन राजाराम हायस्कूल या मार्गावर दुकाने, घरे आहेत. ती आहे तेथे उंच करून त्याखाली पार्किंग व्यवस्था करता येणे शक्य आहे. त्यानुसार संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.