Kolhapur temperature drop | कोल्हापूरचा पारा घसरला; थंडी वाढली Pudhari News Network
कोल्हापूर

Kolhapur temperature drop | कोल्हापूरचा पारा घसरला; थंडी वाढली

तापमान 14.6 अंशांवर; आठ वर्षांनंतर नोव्हेंबरमध्ये नीचांकी किमान तापमानाची नोंद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरात हुडहुडी भरविणार्‍या थंडीची अनुभूती होत आहे. मंगळवारी यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. पारा 14.6 अंशांपर्यंत घसरला असून, गेल्या आठ वर्षांतील हे नीचांकी किमान तापमान आहे. परिणामी, शहरासह जिल्ह्यात रात्री व पहाटे थंडीच्या लाटेची अनुभूती देणारे वातावरण आहे. दरम्यान, शनिवारी (दि. 22) पावसाचा हलका शिडकाव होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.

नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे 16 ते 18 अंशांच्या आसपास राहणारे किमान तापमान यंदा अचानक 14 अंशांच्या घरात आल्याने शहरात कमालीचा गारवा जाणवत आहे. रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास शहर धुक्यात हरवले होते. सोमवारी सायंकाळपासून कडाक्याची थंडी जाणवत होती. किमान तापमान 14.8 अंशांपर्यंत खाली आल्याने रात्री थंडीची तीव—ता वाढली होती. मंगळवारी घट झाल्याने सकाळी कोल्हापूरकरांना हुडहुडी भरली होती. मंगळवारी सायंकाळनंतरही गारवा कायम होता.

हवामान खात्याच्या नोंदीनुसार, कोल्हापुरात नोंदविले गेलेले 14.6 अंश सेल्सिअस तापमान सामान्य किमान तापमानापेक्षा (-3.5) खूपच खाली आहे. गेल्या 15 वर्षांच्या मासिक नोंदी पाहता, 2016 मध्ये 27 तारखेला 14.6 इतके किमान तापमान नोंदवले गेले होते. त्यामुळे 2016 नंतर प्रथमच नोव्हेंबरमध्ये तापमान पुन्हा इतके खाली आले आहे. कमाल तापमान 28.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सरासरीपेक्षा 1.7 ने कमी होते.

गारवा जाणवतोय 12 अंशांचा

कोल्हापुरात पारा 14 अंशांच्या घरात आला आहे. मात्र, वाढलेली वार्‍याची तीव—ता, स्वच्छ आकाश आणि पृष्ठभागावरील झपाट्याने होणारे विकिरणीय शीतलन यामुळे प्रत्यक्ष किमान तापमानापेक्षा वातावरणात दोन अंश कमी गारवा जाणवत आहे. किमान तापमान रात्री व पहाटे जरी 14.6 अंशांवर असले, तरी बोचर्‍या वार्‍यामुळे ते 12.5 ते 13.5 अंश इतक्या गारव्याची अनुभूती देत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT