कोल्हापूर : नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर होताच हद्दीतील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर आणि फलक उतरविण्यास सुरुवात झाली. मंडळांचे, पक्षांचे फलक झाकून ठेवण्याचे कामही सुरू आहे. आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता त्या क्षेत्रात बुधवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून जाहिरात फलकांनी व्यापलेल्या चौकांनी मोकळा श्वास घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे काही दिवसांपासून लक्ष लागले होते. काही कारणांमुळे निवडणुका या लांबतच गेल्या. त्यामुळे इच्छुकांमध्ये घालमेल सुरू होती. अगोदर नगरपालिका, नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती का महापालिकेची निवडणूक होणार याविषयी रोज उलटसुलट चर्चा ऐकावयास मिळत होत्या. अखेर मंगळवारी दुपारी आचारसंहिता जाहीर करण्यात आली.
जिल्ह्यातील 10 नगरपालिका व 3 नगर पंचायतींमध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये कागल, कुरुंदवाड, गडहिंग्लज, जयसिंगपूर, वडगाव, शिरोळ, मुरगूड, मलकापूर, पन्हाळा, हुपरी या नगरपालिका तर नव्याने स्थापन झालेल्या हातकणंगले, आजरा, चंदगड या नगरपंचायतींचा समावेश आहे. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर शहरांच्या हद्दीतील राजकीय पक्षांचे पोस्टर, बॅनर आणि फलक उतरविण्यात येऊ लागले आहे. तसेच राजकीय पक्षांचे व मंडळांचे फलक झाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कागल : पालिका प्रशासनाने डिजिटल फलक काढून विविध विकासकामाच्या पाट्या झाकण्याची मोहीम दिवसभर राबविली. आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी बहुतांशी फलक उतरविले. सायंकाळी उशिरापर्यंत ठिकठिकाणी ही कारवाई सुरू होती. प्रशासन अॅक्शन मोडवर आलेले आहे.