कोल्हापूर : हवामान बदलाचे संकट आता पृथ्वीभोवती वेगाने घोंगावत आहे. हे संकट केवळ तापमानातील व पावसातील बदलांपुरते मर्यादित राहिले नाही. याचा आघात थेट पृथ्वीच्या वातावरणातील लहरींवर होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कोल्हापूरवरच्या अवकाशात या लहरींमध्ये अस्थिरता दिसली आहे. या लहरी अस्थिर झाल्या की, कोल्हापुरात महापूर आणणारा प्रलयंकारी पाऊस, असह्य उष्णतेच्या लाटा, अचानक तापमानात चढ-उतार दिसू लागतात.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पृथ्वीच्या वातावरणातील लहरींमधील अस्थिरतेमुळे होणार्या प्रलयंकारी घटनांचा घेतलेला आढावा... पृथ्वीच्या वातावरणात अनेक प्रकारच्या अद़ृश्य लहरी कार्यरत असतात. या लहरी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आकाशात तपांबर ते स्थितांबर या आठ ते दहा किलोमीटरच्या अंतरावर असतात. यामध्ये अल्ट्रा फास्ट केल्विन (यूएफके), 6.5-डे रॉस्बी, 16-डे रॉस्बी, मेडन जुलियन ऑसिलेशन (एमजेओ) आणि गुरुत्वीय या प्रमुख लहरींचा समावेश होतो. या लहरी पूर्व-पश्चिम दिशेने वातावरणात फिरत राहतात आणि त्यांच्या गती-प्रकृतीमध्ये बदल झाला की, त्याचा थेट परिणाम हवामानावर दिसतो.
कोल्हापूरमधील मीडियम फ्रिक्वेन्सी रडारवर 110 कि.मी. उंचीपर्यंत झालेल्या निरीक्षणात या लहरींमध्ये झालेले बदल स्पष्ट दिसून आले आहेत. या लहरींमध्ये ऋतूनुसार बदल आणि विस्कळीत चक्रवाढ वाढलेली दिसली. यामुळे हवामान बदलाचा घाला केवळ पृथ्वीच्या पृष्ठभागावरच नाही, तर तो वातावरणातील अद़ृश्य लहरींवरदेखील होत आहे. हे सारे भयावह चित्र हवामान बदलाचे संकट आपल्याला चोहोबाजूंनी घेरत आहे, हे स्पष्ट करते.
रॉस्बी लहरी हवामानाच्या स्थैर्यावर परिणाम करतात. विशेषतः, 6.5-डे लहरी जेव्हा जोरात असतात, तेव्हा वातावरणात वारे उलट दिशेने वाहू लागतात, ज्यामुळे ढगांच्या गतीत आणि पावसाच्या वितरणात गोंधळ निर्माण होतो. या लहरींचा प्रभाव एप्रिल-मे आणि सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये जास्त जाणवतो. यामध्ये बदल झाला की कोल्हापुरात अतिवृष्टीच्या घटना दिसतात.
रॉस्बी 16-डे लहरी कोणत्याही ऋतूत सक्रिय होऊ शकतात आणि वातावरणात मोठ्या प्रमाणावर ऊर्जा पसरवतात. यामुळे उष्णतेच्या लाटा अचानक वाढू शकतात. 2023 मधील एप्रिलमध्ये नोंदवलेली 41.2 अंशांची उष्णता, ही अशाच लहरींच्या असंतुलनाचे एक उदाहरण मानली जाऊ शकते. ग्रॅव्हिटी वेव्हस्ची अर्थात गुरुत्वीय लहरी मोठ्या लहरींना प्रभावित करतात. या लहरी वरच्या थरात ऊर्जा पोहोचवतात आणि मोठ्या प्लॅनेटरी लहरींच्या गती आणि दिशेला वळवतात. त्यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक हवामानावर लगेच परिणाम होतो. गुरुत्वीय लहरींचा परिणाम 2019 साली जुलै महिन्यात आलेल्या महापुरावेळी दिसून आला होता.
मेडन जुलियन ऑसिलेशन ही 30 ते 60 दिवस चालणारी मोठ्या प्रमाणावर ऊर्जा वाहून नेणारी लाट आहे. ही लाट कोल्हापुरात मान्सूनच्या आगमनाच्या वेळेस पावसाचे स्वरूप ठरवते. जर ही लाट अनियमित झाली, तर पावसाची वेळ चुकते. कधी जास्त, कधी फारच कमी पाऊस पडतो.
या सार्या लहरी पूर्वी ठराविक कालखंडात, ठराविक पद्धतीने सक्रिय होत असत. मात्र, हवामान बदलामुळे या लहरींच्या आवर्तनामध्ये अनियमितता आली आहे. काही वेळेस लहरींचा जोर कमी होतो, तर काही वेळेस त्या सहसा नसलेल्या काळातही प्रबळ होतात. ही अस्थिरता कोल्हापुरात अचानक पूर, उष्णतेत उसळी किंवा अतिवृष्टीसारख्या घटनांना कारणीभूत ठरते.डॉ. रुपेश घोडपागे, मीडियम फ्रिक्वेन्सी रडार