कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने (एमपीएससी) घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेच्या पेपर तपासणीत घोळ झाला आहे. उत्तर बरोबर दिले असून सुद्धा काहींना शून्य गुण तर अनेक विद्यार्थ्यांच्या चुकीच्या उत्तरांना गुण दिल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे. माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिका मागितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड आला आहे.
‘एमपीएस’च्या वतीने स्थापत्य अभियांत्रिकी सेवेमधील विविध विभागांमधील गट अ व ब राजपत्रित पदांसाठी (सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पाणी पुरवठा, स्वच्छता, मृदू व जलसंधारण) विभागाच्या 495 जागांसाठी जाहिरात निघाली होती. 4 जून 2023 रोजी पूर्वपरीक्षा झाली. त्यानंतर 28 जानेवारी 2024 रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली. मुख्य परीक्षेनंतर एक वर्षाने 27 जानेवारी 2025 ला मुलाखतीची प्रक्रिया पार पडली. जून 2025 मध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झाली.
दरम्यान, मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी माहिती अधिकारात उत्तरपत्रिकांची मागणी केली. मुख्य परीक्षा 7 हजार विद्यार्थ्यांनी दिली त्यातल्या 20 जणांनी माहितीच्या अधिकारात मागितलेल्या उत्तर पत्रिकांमध्ये इतकी तफावत आढळली आली आहे. परीक्षकांनी दिलेल्या गुणांमध्ये जास्त तफावत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. यात एका उमेदवाराने लिहिलेल्या अचूक उत्तरास 8 पैकी 0 गुण व त्याच प्रश्नासाठी दुसर्या उमेदवाराने लिहिलेल्या चुकीच्या उत्तरास 8 पैकी 4 गुण दिले आहेत. सामान उत्तरांसाठी 8 पैकी 3 तर काहींनी त्याच उत्तराला 8 पैकी 7 गुण दिले आहेत. विचारलेल्या प्रश्नाशी पूर्णपणे विसंगत उत्तराला गुण दिले आहेत. स्पष्टीकरणासह लिहिलेल्या उत्तरास 8 पैकी 1 तर अगदी थोडक्यात लिहिलेल्या उत्तरास 8 पैकी 2 गुण दिले आहेत. उत्तरपत्रिका तपासणीसाठी परीक्षकांकडे कोणताही संदर्भ नव्हता, त्यामुळे गुणांमध्ये तफावत आढळून आली आहे.
एमपीएससीच्या वतीने पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने परीक्षा घेतली. पेपरची कोणत्याही पद्धतीने ‘नमुना उत्तर पत्रिका’ काढली नाही. त्यामुळे हा गोंधळ झाला असल्याचे काही विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. एमपीएससीने पुढील प्रक्रियेस स्थगिती द्यावी, पुन्हा फेर परीक्षा घ्यावी, अशी मागणी होत आहे.
एमपीएससीने घेतलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा 2023 मध्ये पेपर तपासणीत मोठी तफावत आढळली. याबाबत काही विद्यार्थ्यांनी माहिती अधिकारात स्वत:च्या उत्तरपत्रिका मागविल्या होत्या. त्या उत्तरपत्रिका पाहिल्यावर पेपर तपासणीत रेफरन्स बुकनुसार बरोबर उत्तरास शून्य गुण तर चुकीच्या उत्तर गुण दिले गेले आहेत. यामुळे उमेदवारांवर अन्याय झाला आहे. यासाठी मुंबई ‘मॅट’मध्ये केस दाखल केली आहे. तरीही ‘एमपीएससी’ भरतीची पुढील प्रक्रिया सुरू ठेवली आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.एक परीक्षार्थी