कोल्हापूर : काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेच्या वीज उपकेंद्राच्या दुरुस्तीच्या कामामुळे कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत राहिला. कसबा बावड्यात कमी आणि अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा झाला. शहरातील काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प होता; तर काही भागांत कमी दाबाने अपुरा पाणीपुरवठा झाला.
शहराला काळम्मावाडी येथील धरणातून थेट पाईपलाईनने पाणीपुरवठा करण्यात येतो. या योजनेला बिद्री येथून वीजपुरवठा करण्यात आला आहे. यासाठी उभारण्यात आलेल्या वीज उपकेंद्रातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम सोमवार (दि. 19) पासून हाती घेण्यात आले होते. हे काम मंगळवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.
दरम्यान, मंगळवारी शिंगणापूर पाणी उपसा योजनेतूनदेखील पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. त्यामुळे काही ठिकाणी अपुरा आणि कमी दाबाने का होईना पाणीपुरवठा झाला. सलग दुसऱ्या दिवशी पाणीपुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, महापालिकेने स्वतःकडील व भाड्याने घेतलेल्या टँकरद्वारे काही भागांत पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला. यावेळी टँकरवर पाणी भरण्यासाठी महिला आणि नागरिकांचीही गर्दी होत होती.