कोल्हापूर : बालिंगा पंप हाऊसजवळ मोठ्या प्रमाणात गळत्या असून लाखो लिटर प्रक्रिया केलेले शुद्ध पाणी दररोज वाया जाते. 
कोल्हापूर

Kolhapur Water Supply : शहरासाठी २२० एमएलडी उपसा; बिलिंग फक्त ८० एमएलडीचे, पाणी मुरतेय कुठे?

पाणीकपातीचा इशारा; महापालिकेच्या यंत्रणेतून लाखो लिटर पाणी वाया!

पुढारी वृत्तसेवा

डॅनियल काळे

कोल्हापूर : पावसाचे घटलेले प्रमाण आणि संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठ्याचा इशारा दिला आहे. मात्र दुसरीकडे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा यंत्रणेतून दररोज लाखो लिटर पाणी गळतीद्वारे वाया जात असल्याचे चित्र आहे. बालिंगा जल शुद्धीकरण केंद्रापासून शहरातील विविध जलवाहिन्यांपर्यंत गळतीचे जाळे कायम आहे. शहरासाठी दररोज सुमारे २२० एमएलडी पाण्याचा उपसा केला जात असताना प्रत्यक्षात केवळ ८० एमएलडी पाण्याचेच बिलिंग होत आहे.

शहराची सध्याची लोकसंख्या आठ लाखांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. महापालिकेकडून थेट पाईपलाईन, बालिंगा, नागदेववाडी, शिंगणापूर आणि काही प्रमाणात कळंबा या जलस्रोतांमधून २२० एमएलडी पाणी उपसा केला जातो. मात्र उपसा केलेल्या पाण्यापैकी प्रत्यक्षात किती पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते, याचा हिशेब पाहिला तर महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट होतात. उपलब्ध आकडेवारीनुसार, केवळ ८० एमएलडी पाण्याचे बिलिंग होते. म्हणजेच उपसा केलेल्या पाण्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात पाण्याचा हिशेब लागत नाही. यामध्ये जल वाहिन्यांमधील गळती, अनधिकृत जोडण्या आणि मीटरिंगमधील त्रुटी यांचा किती वाटा आहे, याचे स्वतंत्र लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे.

या अपव्ययाचा आर्थिक फटकाही महानगरपालिकेला बसत आहे. पाणी उपसा आणि शुद्धीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च होत असताना त्यातून मिळणाऱ्या पाण्याचे उत्पन्न मात्र मर्यादित राहते. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे आर्थिक गणितही बिघडत आहे. पाणी कुठे जाते, किती वाया जाते आणि त्याला जबाबदार कोण, याचा ठोस शोध घेण्याची गरज आहे.

दुष्काळसदृश परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. अशा वेळी नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा इशारा देण्याऐवजी आधी पाणीपुरवठा यंत्रणेतील गळती रोखण्यावर भर देणे गरजेचे आहे. शहरात ‘मिशन पाणी वाचवा’ मोहीम राबवून गळतीची ठिकाणे शोधणे, तातडीने दुरुस्ती करणे, जलवाहिन्यांचे ऑडिट करणे आणि उपसा ते बिलिंग या संपूर्ण प्रक्रियेचा हिशेब पारदर्शकपणे मांडणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करायचे आणि महापालिकेच्या यंत्रणेतून लाखो लिटर पाणी वाया जाऊ द्यायचे, हा विरोधाभास कायम राहणार आहे.

जुन्या-नव्या जलवाहिन्यांचा घोळ कायम

बालिंगा परिसरापुरतीच गळतीची समस्या मर्यादित नाही. शहरातील अनेक भागांत जुन्या आणि नव्या जलवाहिन्यांमधून पाणी गळतीच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्या तरी जुन्या वाहिन्यांचे जाळे, जोडण्या आणि दुरुस्तीचा प्रश्न कायम आहे. जुन्या-नव्या अशा दोन्ही जलवाहिन्यात पाणी असते.

बालिंग्यापासूनच गळतीचे पाणी!

बालिंगा जलशुद्धीकरण केंद्र, संप आणि पंप हाऊस परिसरातच अनेक ठिकाणी गळतीतून दररोज लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणांहून वाहणारे पाणी नाल्यातून वर्षभर वाहत असल्याचे दिसते. पाण्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन नागरिकांना काटकसरीचे आवाहन केले जात असताना महापालिकेच्या महत्त्वाच्या जलशुद्धीकरण केंद्रातच पाण्याचा अपव्यय सुरू राहणे ही गंभीर बाब आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT