कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ करणे फार गरजेचे आहे. हद्दीच्या प्रस्तावित गावांतील जनतेच्या काही अडचणी आहेत. पण त्या सोडविण्याची शंभर टक्के ग्वाही मी येथील लोकप्रतिनिधींना देतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी स्पष्ट केले. शेंडा पार्क येथे खंडपीठासाठी ७५ एकर जागा देत आहोत. त्यासह प्रस्तावित आय.टी. पार्क, कन्व्हेंशन सेंटर लवकरच सुरू होणार असून यामुळे दररोज २० ते २५ हजार नागरिकांची अधिकची ये-जा होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर अधिक सुनियोजित करायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरातील १८५० कोटींच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते डिजिटल पद्धतीने झाले. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूर कुस्तीचे माहेरघर आहे. येथे फुटबॉल, हॉकीचेही फॅन आहेत. क्रिकेटही मोठ्या प्रमाणात खेळले जाते. राज्य शासनाने क्रिकेट स्टेडियमसाठी जागा दिली आहे. बीसीसीआयच्या माध्यमातून येथे अत्याधुनिक स्टेडियम बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे कोल्हापूरवर प्रेम आहे. तांबड्या-पांढर्यावरही प्रेम आहे. कोल्हापूरकरांनी महायुतीला भरभरून आशीर्वाद दिला आहे. तुमच्यासाठी काही केले नाही तर आमच्यासारखे कोणी करंटे नाही. काही काळजी करू नका. आजपर्यंत कोल्हापूरला काही कमी पडू दिले नाही आणि यापुढेही काही कमी पडू देणार नाही.