कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. 7) रंगपंचमीनिमित्त सप्तरंगांची उधळण होणार आहे. शहरात विविध ठिकाणी दिवसभर विविध कार्यक्रमांचेही आयोजन केले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 7) रात्री उशिरापर्यंत रंग, पिचकारी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होती.
कोल्हापुरात बहुतांशी होळीनंतरच्या पाचव्या दिवशी येणाऱ्या रंगपंचमीदिवशीच रंग खेळले जातात. यंदा रविवारी (दि. 8) रंगपंचमी आली आहे. शासकीय तसेच शाळा, महाविद्यालयांना सुट्टी असल्याने शालेय मुले, तरुणाई तसेच महिलांनी यासाठी दोन दिवसांपासून तयारीही सुरू केली. बाजारगेट, महापालिका परिसर, मिरजकर तिकटी, नंगीवली चौक, निवृत्ती चौक, राजारामपुरी जनता बाजार परिसर या ठिकाणी रंगपंचमीसाठी आवश्यक साहित्य विक्रीसाठी ठेवले आहेत. यामध्ये लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या पिचकाऱ्या, फुगे, पिवडीची पोती यासह नैसर्गिक रंगाचा समावेश आहे. शक्यतो नैसर्गिक रंगांचा वापर करावा, पाण्याचा कमी वापर करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
महिलांसाठी विशेष कार्यक्रम
शहरामध्ये रंगपंचमीनिमित्त काही ठिकाणी महिलांसाठी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये एनसीसी ऑफिस, अंबाई टँक परिसर, साने गुरुजी वसाहत या ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये लेडी डीजे, रेन डान्स, स्पॉट गेमचे आयोजन केले असून मोफत प्रवेश असणार आहे. रंगपंचमीदिवशी वेगाने वाहने चालविणारे, रस्त्यावरून जाणाऱ्यांना रंग मारणे, महिलांची छेडछाड करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. निर्भया पथकासह अन्य पथके शहरातून फिरून हुल्लडबाजांवर कारवाई करणार आहे.