कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा वर्षपूर्ती सोहळा थाटात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीला कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशनचे पदाधिकारी, ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

Kolhapur Circuit Bench | सर्किट बेंच वर्षपूर्ती सोहळा १६ ऑगस्टला

सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री, केंद्रीय कायदा- न्यायमंत्री, मुख्य न्यायमूर्तींंची उपस्थिती : व्यापक नियोजनाचा बैठकीत निर्धार

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ लोकलढ्यानंतर स्थापन झालेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा वर्षपूर्ती सोहळा दि. १६ ऑगस्टला कोल्हापूरला साजेशा थाटात साजरा करण्याचा निर्धार कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशन पदाधिकारी व ज्येष्ठ विधिज्ञांच्या बैठकीत शुक्रवारी करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कायदा व न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होत आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा वर्षपूर्ती सोहळा व्यापक आणि भव्य-दिव्य थाटात साजरा करण्यासाठी न्याय संकुलातील छत्रपती शाहू सभागृहात जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेंद्र मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह सोलापूर जिल्ह्यातील बार असोसिएशन पदाधिकारी व ज्येष्ठ विधिज्ञांसह महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे नूतन सदस्यही उपस्थित होते.

प्रारंभी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मंडलिक यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कोल्हापूर खंडपीठासाठी सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशन, वकील, पक्षकारांसह सामाजिक संस्था, संघटनांच्या लढ्याला गतवर्षी यश आले. सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यामुळे सर्किट बेंचपाठोपाठ कोल्हापूर खंडपीठाचे स्वप्न साकार होत आहे. ही अभिमानाची बाब असल्याने वर्षपूर्ती सोहळ्यात न्यायमूर्ती गवई यांचा यथोचित सन्मान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत बार कौन्सिल सदस्य ॲड. विवेक घाटगे, संग्राम देसाई, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. श्रीकांत जाधव, ॲड. दीपक पाटील, एस. के. पाटील, सरकारी वकील प्रियांका राणे, वीरेंद्रसिंह निंबाळकर, प्रमोद भोकरे, भाऊसाहेब पवार, परिमल इंगळे, आर. आर. तोष्णीवाल, तेजपाल इंगळे यांनी भाग घेतला. बार असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय घाटगे यांनी आभार मानले. कोल्हापूर सर्किट बेंच, खंडपीठासाठी योगदान दिल्याबद्दल तत्कालीन न्यायमूर्ती भूषण गवई यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, असा ठरावही यावेळी बैठकीत करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT