कोल्हापूर ः शिक्षकांनो सामाजिक भान जपण्यासाठी अनंत चतुर्दशीला विसर्जन मिरवणुकीत काम करा, असे आदेश सर्किट बेंचच्या डिव्हिजनल बेंचने बुधवारी (दि. 3) दिले. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक व न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर याचिकेवर सुनावणी झाली. पुढील सुनावणी 23 सप्टेंबरला ठेवण्यात आली. महापालिकेच्या वतीने अॅड. अभिजित आडगुळे यांनी बाजू मांडली.
कोल्हापूर शहरातील 458 प्राथमिक, माध्यमिक व महापालिकेच्या शिक्षकांना महापालिकेने आदेश काढले आहेत. यात महापालिकेचे 139, प्राथमिकचे 150 व माध्यमिकच्या 169 शिक्षकांचा समावेश आहे. दि. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून त्या दिवशी कामावर हजर राहावे. गणेश विसर्जनावेळी प्रत्येक प्रभागात शिक्षकांना ड्युटी लावण्यात आल्या आहेत. त्याविरोधात महापालिका व खासगी प्राथमिक शिक्षकांच्या संघटनांनी सर्किट बेंचमध्ये 2 सप्टेंबरला याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे.
याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. आदित्य रक्ताडे यांनी युक्तिवाद करताना शिक्षकांना अशैक्षणिक कामे देण्यास मनाई आहे. फक्त निवडणुकीसंदर्भात कामे, जनगणना आदी कामे प्रशासन देऊ शकते, तरीही महापालिकेने अनंत चतुर्दशीला शिक्षकांना काम लावल्याचे सांगितले. त्यावर अॅड. आडगुळे यांनी आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महापालिकेने हे आदेश काढल्याचे सांगितले. त्यावर न्यायमूर्तींनी घटना घडलेली नाही, तरीही आदेश का काढले, अशी विचारणा करत घटना घडल्यानंतर असे आदेश काढू शकता, असे स्पष्ट केले.
अॅड. आडगुळे यांनी एखादी घटना घडण्यापूर्वी तत्काळ मदतीसाठी महापालिकेने आदेश काढले आहेत. शैक्षणिक कामे लावता येत नाहीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे असले, तरी तो नियम फक्त प्राथमिक शिक्षकांसाठी लागू आहे. माध्यमिक शिक्षकांसाठी असे आदेश काढले जाऊ शकतात, असा युक्तिवाद केला. अॅड. रक्ताडे यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून यंदाच्यावेळी अनंत चतुर्दशीला काम करण्यास शिक्षक तयार असल्याचे सांगितले. त्यावर न्यायमूर्तींनी महापालिकेला याचिकाप्रश्नी पंधरा दिवसांत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले.