कोल्हापूर : कोल्हापूर सर्किट बेंचचे नियमित कामकाज सोमवार (दि. 18) पासून सुरू होणार आहे. यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, याकरिता शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सीपीआर चौक ते नियोजित करवीर तहसील कार्यालय (टाऊन हॉल), सीपीआर चौक ते दसरा चौक आणि सीपीआर चौक ते सिद्धार्थनगर कमान या परिसरात नो पार्किंग आणि नो हॉकर्स झोन जाहीर केला आहे. त्याचा जाहीरनामा बुधवारी (दि. 13) प्रसिद्ध करण्यात आला.Kolhapur Circuit Bench inauguration
या तिन्ही मार्गांच्या दोन्ही बाजूंना वाहनांचे पार्किंग करता येणार नाही. तसेच, या मार्गांच्या दोन्ही बाजूस कोणत्याही प्रकारचे अतिक्रमणही करता येणार नाही. हा जाहीरनामा प्रायोगिक तत्त्वावर 17 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत राबविला जाणार आहे. दरम्यान, याबाबत हरकती अगर सूचना असल्यास त्या 13 ऑगस्टपासून पुढील 15 दिवसांत शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडे पाठविता येणार आहेत. या वाहतूक नियोजनाबाबत नागरिक, रहिवासी व वाहनचालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केले आहे.