राजेंद्रकुमार चौगले
कोल्हापूर : अहो... मी सर्किट बेंच बोलतोय..! हो, तोच मी, ज्याला तुम्ही कधी ‘फिरते न्यायालय’ तर कधी ‘खंडपीठ’ म्हणून ओळखता. माझा जन्म हा विटा, सिमेंट आणि दगडांनी नाही, तर कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांच्या आशेने, त्यांच्या न्यायाच्या भुकेने आणि व्यवस्थेच्या करुणेने झाला आहे. मी केवळ एक इमारत नाही, तर एका जिवंत विचाराचा एक साक्षीदार आहे, तो विचार म्हणजे, ‘न्याय प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचला पाहिजे’.
माझी कहाणी सुरू होते त्या काळात, जेव्हा न्यायासाठी लोकांना मैलोन् मैल प्रवास करावा लागायचा. राज्याच्या राजधानीत असलेल्या मुख्य न्यायालयापर्यंत पोहोचणं हे अनेकांसाठी एक स्वप्नच होतं. पैसा, वेळ आणि शारीरिक त्रासामुळे अनेकजण न्यायाच्या दारापर्यंत पोहोचण्याआधीच हार मानत. त्यांच्या मूक आक्रोशातून, त्यांच्या थकलेल्या पावलांच्या आवाजातून आणि त्यांच्या हताश नजरेतून माझा जन्म राजर्षी शाहूरायांच्या करवीरनगरीमध्ये रविवार दि. 17 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी झाला.
प्रारंभी सहा जिल्ह्यांतील न्याय मागणार्यांसाठी मी मुंबानगरीमध्ये एक तात्पुरती सोय म्हणून ओळखीचा होतो. या ठिकाणी वर्षातून काही महिनेच माझं अस्तित्व असायचं. एखाद्या सरकारी इमारतीच्या रिकाम्या खोल्यांमध्ये माझा संसार थाटला जायचा. न्यायाधीश, वकील आणि कर्मचारी यांचा ताफा यायचा आणि काही काळासाठी हा परिसर अपेक्षित न्यायाच्या जयघोषाने दुमदुमून जायचा. यावेळी माझ्या भिंतींवर नवीन रंगाचा वास आणि जुन्या फायलींचा सुगंध एकत्र दरवळायचा. सोमवार, दि.18 ऑगस्ट रोजी सकाळी पहिल्यांदा जेव्हा माझ्या न्यायालयात हातोडा वाजणार, तो आवाज माझ्यासाठी एखाद्या नवजात बालकाच्या पहिल्या रडण्यासारखाअसेल अन् तीच माझ्या अस्तित्वाची जिवंत खूण ठरणार, यामध्ये शंका नाही.
दिवसामागून दिवस हळूहळू मी इथल्या रांगड्या माणसांच्या तांबड्या मातीमध्ये रुळायला लागेन अन् त्यानंतर मात्र मी तात्पुरता पाहुणा ही ओळख पुसून या भूमीचा एक अविभाज्य भाग झालेलो असेन. माझ्या छताखाली सत्य आणि असत्याचं रोजचं युद्ध चालणार. कधी सत्य लपतं, तर कधी ते प्रखरपणे समोर येईल. यापूर्वी मी पाहिलं आहे की, पुरावे आणि साक्षीदारांच्या जगात ‘सत्य’ किती सापेक्ष असू शकतं; पण माझा प्रयत्न नेहमीच न्यायाच्या पारड्याला सत्याच्या बाजूने झुकवण्याचा राहिला आहे आणि कोल्हापुरामध्येही तो कायम राहील, असे वाटते.
मला फक्त कौटुंबिक कलह, जमिनीचे वाद किंवा गुन्हेगारी खटलेच पाहावे लागणार नाहीत, तर मी ज्या सहा जिल्ह्यांतील खटल्यांचा न्यायनिवाडा करणार आहे, त्या सर्व जिल्ह्यांचा येत्या काळामध्ये चौफेर आणि सर्वांगीण विकासही पाहायचा आहे. शेतकर्यांच्या पाण्याच्या हक्कापासून ते कामगारांच्या अधिकारांपर्यंत माझ्या निर्णयांमधून या भूभागाचं भविष्य घडताना मला अनुभवयाचं आहे. मी आता ‘फिरतं न्यायालय’ असलो, तरी येत्या काळामध्ये एक कायमस्वरूपी ‘खंडपीठाची वस्त्रे परिधान करावी लागणार आहेत. दोन-तीन वर्षांमध्ये कोल्हापुरातील शेंडापार्क येथे माझी स्वतःची भव्य इमारत उभी राहील; पण माझा आत्मा त्या दिवशीही आज पहिल्या दिवसासारखाच राहील... लोकांच्या जवळचा, त्यांच्यातला एक.
मी सर्किट बेंच बोलतोय..! मी फक्त एक इमारत नाही, तर या भूमीच्या लेकरांच्या विश्वासाचा भक्कम आधारस्तंभ आहे. मी एक वचन आहे, जे सांगतं की, कितीही अंधार झाला, तरी न्यायाचा दिवा विझणार नाही. तो तुमच्या जवळ, तुमच्यासाठी चिरंतन तेवत राहील... तेवत राहील अन् तेवत राहील.
माणसांचे चेहरे : डोळ्यांत आसवं आणि हातात कागदपत्रांचं बंडल घेऊन आलेले चेहरे.... जमिनीच्या एका लहान तुकड्यासाठी आयुष्यभर भांडणारे भाऊ... पोटच्या गोळ्यासाठी लढणारी आई..., तर कधी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगणारा निर्दोष... या सगळ्यांच्या भावना मला भाऊसिंगजी रस्त्यावर असलेल्या या न्याय देणार्या माझ्या भिंतींमध्ये शोषून घ्याव्या लागणार, हे निश्चित!
वकिलांचे युक्तिवाद : तरुण, उत्साही वकिलांना न्यायासाठी तळमळीने युक्तिवाद करताना पाहावं लागणार. यावेळी त्यांचे ‘शब्द’ धारदार तलवारीसारखे असणार, तर दुसरीकडे, अनुभवी आणि मुरब्बी वकिलांचे शांत पण प्रभावी युक्तिवादही मला ऐकावे लागणार, ज्यात कायद्याच्या ज्ञानासोबत अनुभवाची खोली असेल. काळे कोट घातलेली ही माणसं माझ्यासाठी न्यायाच्या रथाचे सारथी झालेले मी पाहणार आहे.
न्यायासनाचा भार : माझ्यासमोर बसलेल्या न्यायाधीशांच्या चेहर्यावरचा ताणही मला अनुभवता येणार आहे. त्यांच्या एका निर्णयावर कोणाचं तरी आयुष्य अवलंबून असतं, याची जाणीव त्यांच्या प्रत्येक कृतीमधून मला पाहता येणार. त्याबरोबरच जेव्हा एखादा गुंतागुंतीचा खटला सुटेल तेव्हा त्यांच्या चेहर्यावर दिसणारं समाधान माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असेल.
मी एक निःशब्द साक्षीदार आहे. मी कोणाच्या बाजूने नसतो. मी फक्त न्यायाच्या बाजूने असतो. माझ्या डोळ्यांसमोर पिढ्या बदलल्या. जे वकील तरुणपणी माझ्यासमोर युक्तिवाद करायचे, ते आज न्यायाधीश म्हणून माझ्या न्यायासानावर बसतात. ज्यांच्या आजोबांचा खटला मी चालवला, त्यांचे नातू आज नव्या उमेदीने माझ्या दारात उभे राहतात. काळ बदलेल, कायदे बदलतील, माणसं बदलतील; पण एक गोष्ट कधीच बदलणार नाही, ती म्हणजे न्यायाची आस! जोपर्यंत ही आस जिवंत आहे, तोपर्यंत माझं अस्तित्व कायम राहील, ते अविचल ध्रुव तार्यासारखं!