law students exam permission | एलएलबीच्या 27 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय 
कोल्हापूर

law students exam permission |एलएलबीच्या 27 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यास परवानगी; कोल्हापूर सर्किट बेंचचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठमधील एलएलबीच्या एटीकेटी लागलेल्या 27 विद्यार्थ्यांना शुक्रवारी (दि. 17) होणार्‍या परीक्षेला बसण्यास कोल्हापूर सर्किट बेंचने परवानगी दिली.

मागील वर्षी एटीकेटी लागून पुढील वर्गात प्रवेश घेतलेल्या एलएल.बी.च्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला होता. याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये 27 विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.

एलएल.बी.च्या विद्यार्थ्यांचा कॅरिऑन सिस्टीमचा वाद मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे एटीकेटी लागूनदेखील पुढील वर्गात तात्पुरते प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू न देण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठाने घेतला होता. याच्या विरोधात रिया पाटील आणि ऋषीकेश जाधव या विद्यार्थ्यांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करून 17 एप्रिल रोजी होणार्‍या परीक्षेला बसण्याची परवानगी मागितली होती. सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिल्यास विद्यापीठ प्रशासनावर ताण येऊ शकतो. ऐनवेळी सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था करावी लागेल. यामुळे केवळ याचिकाकर्त्या 27 विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी द्यावी. त्यांची व्यवस्था विद्यापीठ करू शकेल, असा युक्तिवाद विद्यापीठाच्या वतीने अ‍ॅड. युवराज नरवणकर यांनी केला.

न्यायमूर्तींनी 27 विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली. यात सांगलीतील एक आणि कोल्हापुरातील 26 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या वतीने अ‍ॅड. सतीश बोरुळकर, अ‍ॅड. कल्याणी माणगावे आणि अ‍ॅड. राहुल शिंदे यांनी बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT