पणजी : गोव्यातील ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने आयोजित ‘व्हेव्हज् फिल्म बाजार’च्या माध्यमातून चित्रपटनिर्मितीच्या जागतिक नकाशावर महाराष्ट्राचे स्थान अधोरेखित करण्याची संधी मिळाली आहे. मुंबईची दादासाहेब फाळके चित्रनगरी, कोल्हापूर चित्रनगरी आणि कर्जत येथील एन. डी. स्टुडिओ या महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या चित्रपटनिर्मिती केंद्रांनी या बाजारात स्वतंत्र स्टॉल उभारले आहेत. त्यामुळे जागतिक बाजारात त्याची चर्चा सुरू आहे.
कोल्हापूर चित्रनगरीने प्रथमच स्टॉलच्या माध्यमातून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील चित्रपटनिर्मिती व्यवस्था जागतिक स्तरावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. विविध राज्ये आणि देशातील चित्रनगरी सुविधांचे २१ स्टॉल फिल्म बाजारमध्ये आहेत. महाराष्ट्राचे तीन स्टॉल येथे आहेत.
देश-विदेशातील चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती संस्थांसमोर महाराष्ट्रातील चित्रीकरणाच्या पायाभूत सुविधा, स्टुडिओ, नैसर्गिक लोकेशन आणि पूरक वातावरण, सादरीकरण या माध्यमातून केले जात आहे. ‘व्हेव्हज् फिल्म बाजार’ हा केवळ चित्रपटांच्या खरेदी-विक्रीचा मंच नसून, चित्रपटनिर्मितीशी संबंधित विविध देश आणि राज्यातील संस्था एकाच छताखाली आणणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ मानले जाते.
महाराष्ट्राची समृद्ध चित्रपट परंपरा, विविध भौगोलिक प्रदेश, ऐतिहासिक वास्तू, नैसर्गिक लोकेशन आणि आधुनिक स्टुडिओ सुविधा यांचा एकत्रित परिचय जाणकारांना या स्टॉलवरून होत आहे.
कोल्हापूर चित्रनगरीच्या पुनरुज्जीवनासाठी व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब सावंत यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या दृष्टिकोनातून गोव्यातील चित्रपट महोत्सवात आम्ही सहभाग घेतला आहे, असे चित्रनगरीच्या स्टॉलचे प्रमुख चंद्रकांत कांबळे आणि त्यांचे सहकारी स्वराज डेमरे यांनी सांगितले.