कोल्हापूर : सोमवार पेठ, गंजी गल्ली येथील चरस आणि गांजा तस्करीप्रकरणी आणखी दोन तस्करांची नावे निष्पन्न झाली. त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. दरम्यान, गुरुवारी स्थानिक गुन्हे अन्वेषणने अटक केलेल्या इरफान खलील मोदी (वय 37, रा. गंजीगल्ली) याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
संशयित इरफान मोदी अमली पदार्थांची तस्करी करीत असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी सापळा रचून अटक केली होती. त्याच्या झडतीत 44 ग्रॅम चरस, 2 किलो 600 ग्रॅम गांजा असा 97 हजार 500 रु.चा साठा जप्त केला.
संशयिताकडे केलेल्या चौकशीत दोन तरुणांकडून अमली साठा विकत घेतल्याचे त्याने कबुली दिली आहे. तपासाच्याद़ृष्टीने संशयिताच्या नावाबाबत पोलिसांनी गोपनीयता पाळली आहे. संशयित मोदीसह अमलीसाठा लक्ष्मीपुरी पोलिसाच्या स्वाधिन करण्यात आला आहे. संशयिताला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. तस्करीप्रकरणी शहरासह कर्नाटकातील रॅकेट चव्हाट्यावर येण्याची शक्यता असल्याचे कळमकर यांनी सांगितले.