Chandgad Sugarcane Crop Fire
चंदगड : मलतवाडी (ता. चंदगड) येथे गोंद्याचा मळा परिसरात सोमवारी (दि. २६) सकाळी वीज वितरणच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत १३ एकरांहून अधिक ऊस क्षेत्र जळून खाक झाले. या दुर्घटनेत शेतकऱ्यांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, गावकऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे सुमारे ३०० पोती भाताचे उत्पादन मिळू शकणारे क्षेत्र आणि ५० एकर ऊस क्षेत्र आगीपासून वाचले.
सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास वीज वितरणच्या तारांमध्ये शॉर्टसर्किट होऊन ऊस पिकाला आग लागली. वाऱ्यामुळे आग पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठे नुकसान टळले. तरीही या आगीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला.
या दुर्घटनेत नामदेव बाबू पाटील, आप्पाजी भरमु पाटील, सतबा रुकमाना सुंडकर, विठोबा कृष्णा पाटील, सुनील धोंडिबा सुंडकर, मायाप्पा नरसु पाटील, धोंडिबा चन्नाप्पा पाटील, बाबू मारुती पाटील, महादेव रामू पाटील, दत्तू वैजू सुंडकर, मयांदू मारुती पाटील, धाकलू सट्टू पाटील, नारायण मारुती पाटील, सुभाष लक्ष्मण पाटील, प्रकाश सट्टूप्पा सरवणकर, दयानंद शिवाजी पाटील, नारायण रानबा पाटील, मारुती यल्लापा सलाम आणि संजीव राणबा पाटील या शेतकऱ्यांच्या ऊस पिकाचे नुकसान झाले आहे.
दरम्यान, ओलम शुगर्सचे नामदेव पाटील, अजित पाटील यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आगीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने शासकीय पंचनामा करावा आणि वीज वितरणच्या तारांमधील शॉर्टसर्किटमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई महावितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.