Kolhapur census 2026 | जिल्ह्यात स्वयंगणना शुक्रवारपासून...  
कोल्हापूर

Kolhapur census 2026 | जिल्ह्यात स्वयंगणना शुक्रवारपासून...

पोर्टलवर भरता येणार माहिती; 16 मेपासून प्रत्यक्ष घरगणना

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला शुक्रवारी प्रारंभ होत आहे. दि.1 मे ते दि.15 मे या कालावधीत नागरिकांना स्वयंगणना करता येणार आहे. जनगणना विभागाच्या पोर्टलवर नागरिकांना आपली माहिती भरता येणार आहे. यानंतर दि. 16 मे ते दि. 14 जून या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरयादी व घरगणना केली जाणार आहे.

देशाच्या 2027 च्या जनगणनेचा कार्यक्रम सुरू झाला आहे. ही 21 व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना आहे. जिल्ह्यात 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घरयादी व घरगणना केली जाणार आहे. तत्पूर्वी, नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी 1 मे ते 15 मे या पंधरा दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

घरभेटीदरम्यान प्रगणकांना द्यावा लागणार आयडी

पोर्टलवर माहिती भरल्यानंतर दि. 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक प्रत्यक्ष घरांना भेटी देणार आहेत. यावेळी स्वयंगणना झाली असेल, तर संबंधित प्रगणकाला तो आयडी द्यावा लागणार आहे. हा आयडी प्रगणक आपल्याकडील पोर्टलवर अपलोड करेल. त्यामुळे संबंधित नागरिकाच्या कुटुंबाची सर्व माहिती अधिकृतरीत्या जनगणनेत नोंद होईल. यामुळे प्रश्न विचारणे आणि त्यानुसार माहिती भरणे यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे.

1 मे रोजी खुले होणार पोर्टल

नागरिकांना https:///se. census.gov.in या पोर्टलवर आपली माहिती भरून स्वयंगणना करता येणार आहे. हे पोर्टल दि. 1 मे रोजी खुले होईल. दि. 15 मेपर्यंत त्यावर माहिती भरता येईल. यानंतर मात्र हे पोर्टल बंद होणार आहे. पोर्टलवर 14 विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय आहे.

माहिती भरल्यानंतर मिळणारा आयडी जपून ठेवावा लागणार

या पोर्टलवर माहिती यशस्वीरीत्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक (आयडी) मिळणार आहे. हा आयडी नागरिकांना मोबाईल, आपल्याकडील डायरी, वही आदीसह सुरक्षित ठिकाणी जतन करून ठेवावा लागणार आहे.

पोर्टलवर अशी भरा माहिती

1. जनगणनेच्या https:///se. census.gov.in या पोर्टलच्या होम पेजवर ‘स्वयंगणना’ (Self- Enumeration) पर्यायावर क्लिक करा.

2. तुमचा चालू मोबाईल क्रमांक द्या. त्यावर एक ओटीपी येईल, तो तिथे टाकून पडताळणी पूर्ण करा.

3. लॉगिन झाल्यानंतर, सर्वप्रथम कुटुंबप्रमुखाचे नाव, वय, लिंग आणि इतर वैयक्तिक तपशील भरा.

4. घराचा पूर्ण पत्ता, गल्ली/रस्ता, वॉर्ड क्रमांक आणि जिल्हा अशी सविस्तर माहिती अचूक नोंदवा.

5. कुटुंबात एकूण किती सदस्य राहतात (पुरुष, महिला आणि इतर) त्यांची संख्या नमूद करा.

6. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे नाव, शिक्षण, व्यवसाय, मातृभाषा आणि जन्मठिकाण यासारखी माहिती एकामागून एक भरा.

7. घराचा प्रकार (कच्चे/पक्के), पिण्याच्या पाण्याची सोय, वीज, शौचालय, वापरली जाणारी इंधने आदीसह वाहने, संगणक आदी सुविधांची माहिती द्या.

8. सर्व माहिती भरून झाल्यानंतर ती पुन्हा एकदा नीट तपासा. काही चूक असल्यास एवळीं पर्यायावर जाऊन ती दुरुस्त करा.

9. माहिती पूर्णपणे बरोबर असल्याची खात्री करून घ्या. खात्री पटल्यानंतर Submit बटण दाबा.

10. अर्ज सबमिट झाल्यावर आयडी क्रमांक मिळेल, तो जतन करून ठेवा, त्याची प्रिंट काढा. तो घरगणनेवेळी प्रगणकाला द्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT