कोल्हापूर : लखलखत्या दीपज्योतींचा प्रकाश, दारापुढे रेखाटलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या, तेल-उटण्याचा सुवास, नयनरम्य आरास, नेत्रदीपक रोषणाईचा थाट, घराघरांतून ऐकू येणारा आनंदाचा स्वर आणि फराळाच्या गोडव्यासोबत रंगलेल्या कौटुंबिक गप्पा... अशा मांगल्यपूर्ण, उत्साही आणि चैतन्यमयी वातावरणात रविवारी नरकचतुर्दशीचा दिवाळीचा मुख्य दिवस कोल्हापूरकरांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.
लक्ष लक्ष दिव्यांच्या प्रकाशाने करवीरनगरी उजळून निघाली. परंपरा, श्रद्धा आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचा सुंदर संगम साधत सर्वत्र दीपोत्सवाचा आनंद ओसंडून वाहत होता. रविवारची सकाळ घराघरांत अभ्यंगस्नानाच्या प्रसन्न वातावरणाने उजाडली. पहाटेपासूनच घरांमध्ये उत्साहाची लगबग सुरू होती. अंगणात आकर्षक रांगोळ्या काढून, फुलांच्या तोरणांनी प्रवेशद्वारे सजवून घरांना मांगल्याचे रूप देण्यात आले. देवघरात दीपप्रज्वलन करून आरती करण्यात आली. त्यानंतर घरासमोर पणत्या, समया आणि आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर उजळून टाकण्यात आला.
दिवाळीच्या फराळाने सणाचा गोडवा अधिकच वाढवला. चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे अशा विविध पदार्थांचा आस्वाद घेत कुटुंबीयांनी एकत्रितपणे आनंदाचे क्षण अनुभवले. नातेवाईक, मित्रमंडळी आणि शेजाऱ्यांना फराळ देत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अनेकांनी कुटुंबीयांसह मंदिरांमध्ये जाऊन देवदर्शन घेतले.
सायंकाळ होताच घरांच्या उंबरठ्यांवर, खिडक्यांमध्ये आणि अंगणात लावलेल्या पणत्यांच्या प्रकाशाने परिसर उजळून निघाला. आकाशकंदील, दीपमाळा आणि रोषणाईने शहरातील प्रत्येक परिसरात दीपोत्सवाचे देखणे चित्र साकारले. आनंद, आपुलकी आणि मांगल्याचा प्रकाश घेऊन आलेल्या दिवाळीच्या मुख्य दिवसाने कोल्हापूरकरांच्या मनात उत्साहाची नवी ज्योत प्रज्वलित केली.