कोल्हापूर : बंद घराच्या पाठीमागील दरवाजातून प्रवेश करून चोरट्याने ६ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह चांदी, रोख ५६ हजार असा नऊ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ताराबाई पार्क येथील सहजीवन परिसरात सोमवारी (दि. १७) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद शिरीष सदाशिव संकपाळ (वय ३१, रा. सहजीवन परिसर, ताराबाई पार्क) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली.
किराणा व्यावसायिक शिरीष संकपाळ हे कुटुंबासह सहजीवन परिसरात राहण्यास आहेत. सोमवारी (दि. १७) सायंकाळी ते कुटुंबासह कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. मंगळवारी (दि. १८) सकाळी साडेनऊच्या सुमारास ते घरी परतले असता, त्यांना घरातील साहित्य विस्कटल्याचे दिसले. तसेच, लॉकरचा दरवाजा उघडा असून, त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, चांदीचे अलंकार लंपास झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचारी, श्वान पथक, ठसेतज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे.
पाठीमागील दरवाजाने प्रवेश
पोलिसांना घराच्या पुढील दरवाजावर कोणतीही तोडफोड दिसून आली नाही. याउलट मागील दरवाजा उघडा असल्याचे संकपाळ यांनी सांगितले. यामुळे चोरट्यांनी मागील दरवाजातूनच प्रवेश केला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
६ तोळे दागिने... अन् रोकड
चोरट्यांनी लॉकरमधील ३५ ग्रॅमचे गंठण, ५ ग्रॅमची सोनसाखळी, ३ ग्रॅमची अंगठी, ६ ग्रॅमचे सोन्याचे वळे, कानातील टॉप्स असा सुमारे ६ तोळे सोन्याचे दागिने तर ५० ग्रॅमचे चांदीचे तोडे, ३० ग्रॅमचा चांदीचा करदोडा, ३० ग्रॅमचे ब्रेसलेट व रोख ५६ हजार लंपास केले.