कोल्हापूर : कोल्हापूर शहराशी एकरूप झालेल्या उचगाव, सरनोबतवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, नवे बालिंगा, नवे पाडळी, पीरवाडी या आठ गावांचा हद्दवाढीत समावेश करून त्यासदंर्भातील प्रस्ताव तत्काळ द्या, असे पत्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना दिले.
आ. क्षीरसागर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, आयुक्त मंजुलक्ष्मी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांना प्रस्ताव देण्याची सूचना केली आहे. ते संबंधित गावांना त्याची माहिती देऊन ठराव करण्यास सांगतील. त्या गावांचे ठराव घेऊन प्रस्ताव राज्य शासनाला सादर करतील. संबंधित गावांनी हद्दवाढीत येण्यास नकार देणारा ठराव केला, तरीही शासनाच्या वतीने हद्दवाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. कारण, कोल्हापूर शहराची नैसर्गिक हद्दवाढ होणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे हद्दवाढ अटळ आहे.
आ. क्षीरसागर म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत हद्दवाढीसंदर्भात बैठक झाली. बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खा. संजय मंडलिक यांच्यासह स्वतः उपस्थित होतो. त्यात फडणवीस व शिंदे यांनी हद्दवाढीला ग्रीन सिग्नल दिला आहे. राज्याचे प्रधान सचिव व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना निवडणूक आयोगाशी चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची हद्दवाढ होणार, हे स्पष्ट आहे. फक्त निवडणुकीपूर्वी की निवडणुकीनंतर याचा निर्णय होईल. दरम्यान, राज्यात नगरपालिका, महापालिकांच्या हद्दवाढीचे 120 प्रस्ताव प्रलंबित असून त्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.
हद्दवाढ ही नैसर्गिक प्रक्रिया असून राज्यातील पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, संभाजीनगर आदी शहरांच्या हद्दवाढीनंतर झालेला विकास पाहता कोल्हापूर मागे पडल्याचे दिसत आहे. शहराची वाढ झपाट्याने होत असून जवळच्या गावांमध्ये नागरी वस्ती विस्तारली आहे. शहर परिसरातील ग्रामीण भागात महापालिकेच्या मूलभूत नागरी सुविधा पुरविण्यात येत आहेत. केएमटी, पाणीपुरवठ्यासह इतर सुविधांचा त्यात समावेश आहे. शहराची हद्दवाढ झाली, तर महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे, असेही आ. क्षीरसागर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला माजी आ. जयश्री जाधव, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, राहुल चव्हाण, रमेश पुरेकर, दुर्गेश लिंग्रस आदी उपस्थित होते.
व्यक्तिगत स्वार्थ न पाहता मी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी निस्वार्थीपणे काम करत आहे; पण कुणाच्या तरी सांगण्यावरून माझ्यावर वैयक्तिक टीकाटिप्पणी करून संभ—म निर्माण केला जात आहे; पण गेली अनेक वर्षे महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. काँग्रेसच्या नेत्यांनी राजकारणापलीकडे महापालिकेच्या विकासाच्या द़ृष्टीने कोणतेच प्रयत्न केले नाहीत. काँग्रेस नेत्यांनी कोल्हापूर शहराचे वाटोळे केले, असा आरोपही आ. राजेश क्षीरसागर यांनी केला.
1) उचगाव, 2) सरनोबतवाडी, 3) मोरेवाडी, 4) पाचगाव, 5) कळंबा तर्फ ठाणे, 6) नवे बालिंगा, 7) नवे पाडळी, 8) पीरवाडी.