कुरुंदवाड : ग्रंथ महोत्सव म्हणजे ज्ञानाचा उत्सव आहे. पुस्तक हे मानवाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारे दीपस्तंभ आहे. वाचनामुळे आपण विचारशील, संस्कारक्षम होतो आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन मिळवतो. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केले.
अब्दुललाट (ता. शिरोळ) येथे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन डॉ. अरुण कुलकर्णी, ग्रामीण साहित्यिक आदाप्पा कुरुंदवाडे, माजी प्राचार्य के. बी. गडकरी, प्राचार्य डॉ. देवेंद्र कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने झाली. ढोल-ताशा, लेझीम, मर्दानी खेळ, मुलींच्या तलवारबाजी यासह रंगतदार मिरवणूक काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरू झालेली दिंडी शहराच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत विद्यालयाच्या प्रांगणात पोहोचली. महिलांनी फुले उधळून व पायावर पाणी घालून दिंडीचे स्वागत केले. दिंडीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी रेखाटण्यात आली होती.
विद्यालयाच्या प्रांगणात भारतीय संविधानाचे पूजन आणि वाचन करण्यात आले. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या संदेशानुसार मोफत शिक्षणाच्या डेमोचे सादरीकरण आणि हवाई रॉकेटची प्रतिकृती उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.
पुस्तक प्रदर्शनात दिवंगत साहित्यिकांच्या प्रतिमा व त्यांच्या संदेशांनी विद्यालयाचा परिसर साहित्यमय झाला होता. दिंडीत डाएटचे प्राचार्य राजेंद्र भोई, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. हजारो विद्यार्थी, वारकरी, नागरिक व महिलांच्या उपस्थितीत हा महोत्सव ज्ञानोत्सवाचे प्रतीक ठरला.