उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पुतळादहनावरून बिंदू चौकात पोलिसांशी झटापट, धक्काबुक्की 
कोल्हापूर

Kolhapur Protest : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पुतळादहनावरून बिंदू चौकात पोलिसांशी झटापट, धक्काबुक्की

संतप्त आंदोलक म्हणाले, एकदाचे मारून टाका!

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आ. संजय गायकवाड यांच्यावर दखलपात्र गुन्हे दाखल न झाल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्ष व पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला.

पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट होऊन धक्काबुक्की झाली. कार्यकर्त्यांना फरफटत नेत पोलिसांनी पुतळा हिसकावून घेतला. यात दोघेजण जखमी झाले. आंदोलकांना एकदाचे मारून टाका, तुमचे मन तरी शांत होईल, अशी उद्विग्न भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांनी बिंदू चौकात सरकारच्या विरोधात निदर्शने करीत घोषणाबाजी केली. अचानक गनिमी काव्याने पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केला. यामुळे गोंधळ उडाला. पोलिसांनी तत्काळ कार्यकर्त्यांच्या हातातून पुतळा हिसकावून घेत अडवले. यावेळी झटापट झाली. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अक्षरश: ओढत नेत धक्काबुक्की केली. यात शिवाजी माळी, दिलदार मुजावर जखमी झाले. धीरज कठरे, सुनील कोळी, सुशील शिंदे, अक्षय दाभाडे, श्रीकांत कोळी यांना ताब्यात घेतले. कॉ. रघुनाथ कांबळे, दिलीप पवार, स्मिता पानसरे, गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर, बाबासाहेब देवकर सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT