कोल्हापूर : भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे कुस्तीगीर स्व. खाशाबा जाधव यांना मरणोत्तर ‘पद्म’ पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सूचना घ्याव्यात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. केंद्र सरकारने या प्रक्रियेसाठी नव्याने अर्ज करण्याची अट ठेवल्यानंतर न्यायालयाने हे पाऊल उचलले आहे.
2026 च्या पुरस्कारांसाठी संधी
केंद्र सरकारच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, पद्म पुरस्कारांसाठी 15 मार्च ते 31 जुलै या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या विंडोत नवीन अर्ज केल्यास त्याचा विचार 2026 च्या पुरस्कारांसाठी होऊ शकतो, ज्याची घोषणा 2027 च्या प्रजासत्ताकदिनी केली जाईल.
44 वर्षांचा इतिहास
1984 मध्ये निधन झालेल्या खाशाबा जाधवांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून इतिहास रचला होता. त्यानंतर तब्बल 44 वर्षांनी टेनिसपटू लिअँडर पेसने भारतासाठी वैयक्तिक पदक मिळवले होते. खाशाबांच्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ मिळावे, यासाठी रणजित जाधव यांच्या ‘कुस्तीवीर खाशाबा जाधव फाऊंडेशन’तर्फे जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.
प्रक्रिया काय आहे?
केंद्र सरकारच्या वतीने अॅड. विजय किल्लेदार यांनी स्पष्ट केले की, शिफारस प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत असलेली ‘पद्म पुरस्कार समिती’ त्यावर विचार करते. त्यानंतर पंतप्रधान हे नाव अंतिम मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे पाठवतात. सध्याची मुदत पाहता राज्याने तातडीने पावले उचलणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले. याप्रकरणी आता मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पुन्हा अर्ज करणे हा अपमान; रणजित जाधव यांची बाजू
न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने खाशाबांचे पुत्र रणजित जाधव यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांना ‘नव्याने अर्ज करणे शक्य नाही का?’ अशी विचारणा केली. त्यावर देसाई यांनी तीव्र आक्षेप नोंदवला. यापूर्वी सात-आठ वेळा अर्ज करूनही त्यावर विचार का झाला नाही, याचे स्पष्टीकरण मिळालेले नाही. आता पुन्हा अर्ज करायला सांगणे हा खाशाबांच्या कर्तृत्वाचा अपमान आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार आणि दिग्गज ऑलिम्पियन खेळाडूंनी शिफारस करूनही आजवर या अर्जांचे काय झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.