कोल्हापूर : राज्य सरकारच्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून शेंडा पार्क येथे छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाची राजर्षी शाहू वैद्यकीय नगरी साकारत आहे. एक हजार 100 बेडस्ची सुविधा येथे उपलब्ध होत असून साध्या आजारापासून ते सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. केवळ महिलांसाठी 100 बेडस्चे स्वतंत्र हॉस्पिटल येथे साकारत आहे. नर्सिंग कॉलेजही येथेच होत आहे. सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे रुग्णांची फरफट वाचणार आहे.
हा संपूर्ण परिसर आता विकसित होत असून नजीकच्या काळात याच परिसरात सर्किट बेंचची इमारत होणार आहे. त्याच्या अलीकडे ही वैद्यकीय नगरी आकाराला येत आहे. त्यासाठी आयसोलेशन हॉस्पिटलपासून स्वतंत्र 100 फुटी रस्ता तयार करण्यात आला आहे. 30 एकरच्या परिसरात रुग्णांना सर्व सुविधा देण्याच्या दृष्टीने याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल हे केवळ एका जिल्ह्याचे नाही तर त्याला विभागीय असेच स्वरूप आले आहे. लगतच्या सीमाभागातून तसेच कोकणातून याठिकाणी मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. त्याची दखल घेऊन शेंडा पार्क येथे तब्बल 600 बेडस्चे सामान्य रुग्णालय होत असून त्याच्या इमारतीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर याठिकाणी 250 बेडस्चा स्वतंत्र कॅन्सर विभाग सुरू होत आहे. त्यामुळे कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईला जाण्याची गरज लागणार नाही. 250 बेडस्चे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होत आहे.
राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालासाठी सध्या एमबीबीएसचे शिक्षण घेणार्या 200 विद्याथिर्र्नींसाठी वसतिगृहाची सुविधा आहे. आता नव्या रचनेत ही सुविधा काही पटीत वाढविण्यात येत आहे. नव्याने 150 क्षमतेच्या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले आहे. ही पाचमजली इमारत असून तेथे पार्किंग केटरिंग या सोयीही आहेत. त्याशिवाय 250 क्षमेतेचे मुलांसाठी व तेवढ्याच क्षमतेचे मुलींसाठीचे वसतिगृहचे बांधकाम सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 125 जागा या इंटर्नसाठी तर तेवढ्याच जागा या पदव्युत्तर एम.डी., एम.एस. शिक्षण घेणार्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
तीन वर्षांचे बी.एस्सी. नर्सिंग कॉलेज सुरू करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध असलेल्या जागेत हे कॉलेज सुरू असून 300 मुलींसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र वसतिगृह महाविद्यालयाची इमारत, खुले नाट्यगृह, कँटीन सुविधा दिली जाणार आहे. त्यालगतच स्वतंत्र क्रीडांगण आहे. त्याच्याशेजारी अत्याधुनिक फॉरेन्सिक लॅबचे काम सुरू आहे. तसेच राष्ट्रीय आरोग्य कृती कार्यक्रमांतर्गत केवळ महिलांसाठीचे स्वतंत्र 100 बेडस्चे हॉस्पिटल उभारण्याचे काम याच परिसरात होते आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात प्रेक्षागृह, 500 विद्यार्थ्यांची सुविधा असलेले परीक्षा भवनही होत आहे.