कोल्हापूर : राष्ट्रीयीकृत, तसेच खासगी बँकांकडून व्यावसायिक कर्जाच्या बहाण्याने शाहूपुरी, असेम्ब्ली रोड येथील साखर व्यावसायिक फर्मला 65 लाख, तर त्यांच्या दिराला 61 लाखांचा गंडा घालणार्या पुणे येथील दाम्पत्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला. मनीष नानासाहेब ऊर्फ नाना ऊर्फ नानाजी देशमुख, संगीता मनीष देशमुख (रा. गोल्डन कॅस्टल फ्लॅट, बालेवाडी, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. 22 डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 काळात हा प्रकार घडला.
शाहूपुरी येथील पार्श्वनाथ शुगर्स फर्मच्या वतीने आरती विजय सन्नके (रा. सर्किट हाऊस परिसर, कोल्हापूर) यांनी संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पार्श्वनाथ फर्मच्या 65 लाखांच्या फसवणुकीशिवाय संशयितांनी आरती सन्नके यांचे दीर महावीर सन्नके (रा. शाहूपुरी, कोल्हापूर) यांच्याकडूनही व्यावसायिक कर्जाचे आमिष दाखवून 61 लाख रुपये उकळल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी आरती सन्नके यांनी आठ महिन्यांपूर्वी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्याकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिस यंत्रणेकडून वेळीच गुन्हा दाखल न झाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार, संशयित मनीष देशमुख, त्याची पत्नी संगीता देशमुखविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शाहूपुरी येथील सन्नके कुटुंबीयांची पार्श्वनाथ शुगर ही नोंदणीकृत फर्म असून, साखर खरेदी- विक्रीचा व्यवसाय करीत करतात. दीर महावीर सन्नके, शंकर पाटील यांच्या माध्यमातून संशयितांची शाहूपुरी येथील कार्यालयात ओळख झाली. यावेळी संशयित स्वत: मनीष देशमुख श्रीम कन्सल्टिंग व पत्नी संगीता देशमुख एस.बी.डी. एंटरप्रायझेस या फर्मचे मालक असल्याचे सांगितले. संबंधित दोन्हीही फर्मच्या माध्यमातून आपण ओळखीने व्यावसायिक, व्यापारी व्यक्तींना राष्ट्रीयीकृत, तसेच खासगी बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देतो, अशी संशयितांनी माहिती दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कर्जाबाबत चर्चा करताना संशयित मनीष देशमुख याने महावीर सन्नके यांचेही कर्ज मंजुरीचे प्रकरण आपण करीत असल्याचे, त्यासाठी त्यांच्याकडून 61 लाख रुपयांसह कागदपत्रेही घेतल्याचे सांगितले. तुमच्या दोघांची कर्ज प्रकरणे असल्यास 15 ते 20 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर होईल, त्यासाठी आणखी 65 लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून संशयिताने विश्वास संपादन केला.
फिर्यादीसह फर्मकडून वेळोवेळी 65 लाख रुपये उकळले
साखर धंद्यातील उलाढालीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने फिर्यादी आरती सन्नके व त्यांच्या फर्मने मनीष देशमुख, संगीता देशमुख यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून दि. 22 डिसेंबर 2023 मध्ये मनीष देशमुख याच्या श्रीम कन्सल्टिंगच्या बँक खात्यावर 10 लाख रुपये आरटीजीएसद्वारे जमा करण्यात आले. 23 डिसेंबर 2023 मध्ये मनीष देशमुख याच्या बँक खात्यावर पुन्हा 10 लाख, त्यानंतर 29 डिसेंबर 2023 मध्ये 10 लाख, 20 जानेवारी 2024 मध्ये 7 लाख 50 हजार रुपये, तर जानेवारी 2024 मध्ये वेळोवेळी कार्यालयीन कर्मचार्यांच्या समक्ष 27 लाख 50 हजार रुपये असे एकूण 65 लाख रुपये जमा करण्यात आले असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
संशयितांकडून उडवाउडवी
दरम्यानच्या काळात फिर्यादी यांचे पती विजय सन्नके यांची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी वर्षभर विश्रांतीचा सल्ला दिला. याकाळात महावीर सन्नके यांनी स्वत: पुण्याला जाऊन मनीष देशमुख व त्याची पत्नी संगीता देशमुख यांची भेट घेतली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पतीची प्रकृती पूर्ववत झाल्याने पतीसह आपण स्वत: पुण्याला जाऊन संशयितांकडे व्यावसायिक कर्जाबाबत विचारणा केली असता, संशयितांनी आपले कर्ज प्रकरण मंजूर होत नाही, असे सांगून घेतलेली रक्कम देण्यास नकार दिला., असे आरती सन्नके यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी
पैशांसाठी तगादा लावल्यास विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची संशयित मनीष देशमुख याने पतीला धमकी दिल्याचेही आरती सन्नके यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संशयित देशमुख दाम्पत्याच्या व्यवहारासंदर्भात पुण्यासह परिसरात चौकशी केली असता, संबंधितांनी 15 ते 20 जणांना गंडा घातल्याची माहिती मिळाल्याचेही सन्नके यांनी फिर्यादीत स्पष्ट नमूद केले आहे.