Kolhapur flood news 
कोल्हापूर

Kolhapur flood: आठ दिवसांतच तिन्ही बंधारे पुन्हा पाण्याखाली; राजापूर बंधाऱ्यावरून ३१,५०० क्यूसेक्स विसर्ग

राजापूर बंधाऱ्याची पाणीपातळी १७ फूट ३ इंच; पंचगंगा ४३ फुटांवर, शेतकरी पाणी वाढण्याच्या प्रतीक्षेत

पुढारी वृत्तसेवा

कुरुंदवाड : कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे अवघ्या आठ दिवसांतच पंचगंगेवरील तेरवाड व शिरोळ तर कृष्णा नदीवरील राजापूर हे तिन्ही बंधारे शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा पाण्याखाली गेले आहेत. राजापूर बंधाऱ्यावरील पाणीपातळी रविवारी सकाळी १७ फूट ३ इंच इतकी नोंदली गेली असून तेथून ३१ हजार ५०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

गेल्या आठवड्यात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने शिरढोण पुलाजवळ नदीपात्रात अडकून राहिलेली आणि पुलालगत साचलेली जलपर्णी आता वाढत्या प्रवाहामुळे तुटून पुढे वाहू लागली आहे. मात्र तिचा मोठा भाग नदीलगतच्या मळी शिवारातील शेतांमध्ये जाऊन स्थिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून, नदीची पाणीपातळी आणखी वाढल्यानंतरच ही जलपर्णी पुन्हा प्रवाहित होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी तेरवाड, शिरोळ आणि राजापूर हे महत्त्वाचे बंधारे शनिवारी सायंकाळपासून जलमय झाले. अवघ्या आठ दिवसांपूर्वीच हे बंधारे पाण्याखालून बाहेर आले होते. मात्र पावसाने पुन्हा जोर धरल्याने ते दुसऱ्यांदा पाण्याखाली गेले आहेत.

रविवारी सकाळी आठ वाजताच्या नोंदीनुसार राजाराम बंधाऱ्यावरील पंचगंगेची पाणीपातळी ४३ फूट ११ इंच, तर राजापूर बंधाऱ्यावर १७ फूट ३ इंच इतकी नोंद झाली. आयर्विन पुलावरून २३ हजार ९१६ क्यूसेक्स, राजापूर बंधाऱ्यावरून ३१ हजार ५०० क्यूसेक्स, तर राजाराम बंधाऱ्यावरून १ लाख २२ हजार ७७१ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT