कोल्हापूर : बालिंगा (ता. करवीर) येथे मंगळवारी सकाळी बेकफेल टेम्पोचा थरार अनुभवायला मिळाला. दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा अचानक बेक फेल झाल्याने चालकाने प्रसंगावधान राखत रस्तालगत असलेल्या झाडाकडे टेम्पो वळविला. यावेळी रस्त्यालगत लावलेल्या तीन दुचाकी टेम्पोने उडविल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. टेम्पोच्या धडकेत दुचाकींचे नुकसान झाले. झाडावर टेम्पो आदळल्याने टेम्पोच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या घटनेने येथे काहीकाळ नागरिकांची धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
दूध वाहतूक करणारा टेम्पो चालक संतोष पाटील (वय 27, रा. भामटे) दूध संघामध्ये घालून टेम्पो घेऊन कोल्हापूरहून कळंबे तर्फ कळे येथे जात होता. यावेळी बालिंगा येथे आल्यावर त्याच्या टेम्पोचा अचानक बेक फेल झाला. त्यामुळे चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला. चालकाने प्रसंगावधान राखत वर्दळ नसलेल्या ठिकाणी एका झाडाच्या दिशेने टेम्पो वळविला. यावेळी रस्त्यालगत असलेला एक इलेक्ट्रिक फलक व तीन दुचाकी टेम्पो उडविल्या. तसेच रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या पाण्याच्या मोकळ्या टाक्याही उडवून देत टेम्पो झाडावर आदळला. यामध्ये टेम्पोच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. टेम्पोच्या धडकेत भाऊ सुतार, सुलतान शेख, अकबर शेख यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर नेहमीच दूध वाहतूक करणारे टेम्पो भरधाव वेगात असतात. दूध वेळेत पोहोच करण्यासाठी टेम्पो चालकांची गडबड सुरू असते. मंगळवारी सकाळीही बेक फेल झालेला टेम्पोही भरधाव वेगात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
...तर अनर्थ घडला असता
भरधाव टेम्पो रस्त्यालगत असलेल्या झाडावर आदळला. टेम्पोलगतच एक बेकरी होती. सुदैवाने टेम्पो या बेकरीमध्ये घुसला नाही, नाही तर अनर्थ घडला असता, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.