कोल्हापूर पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात लोकराजा कृतज्ञता पर्व साजरे केले जाणार आहे. त्याचा प्रारंभ दि. 18 एप्रिलपासून होणार आहे. या पर्वात संस्था, संघटना, नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केले. याबाबत राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खा. संभाजीराजे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, या उपक्रमासाठी सूचनांचा स्वीकार केला जाईल. राज्यात छत्रपती शाहू महाराजांनी ज्या-ज्या ठिकाणी भेटी दिल्या आहे, त्या ठिकाणीही कार्यक्रम होतील. काही कार्यक्रम सांस्कृतिक विभागाकडून केले जातील. शाहू मिल व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्मृती- शताब्दी पर्वातील काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातील. शाहू मिल स्मृती स्थळ म्हणून विकसित केले जाईल.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ म्हणाले, शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारा जगातील एकमेव राजा, पुरोगामी विचारांचा जागर करणारा राजा असून या पर्वात त्यांच्या कार्याला उजाळा दिला जाईल. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपतींना देऊन हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येईल.
खा. संभाजीराजे म्हणाले, यानिमित्त राज्यातील नामवंत शेतकर्यांची अॅग्रिकल्चर कार्यशाळा घ्यावी. दिल्लीतही कार्यक्रम व्हावा, शाहू महारांजानी भेट दिलेल्या ठिकाणी कार्यक्रम व्हावेत, कोल्हापूरला जागतिक स्तरावर पोहचवावे, शाहू मिल काम आणि शाहू महाराजांनी उभारलेल्या वास्तूंचे संरक्षण, शाहूंच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा, खासबाग मैदानावर महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी स्पर्धाचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी आमदार पी. एन. पाटील, राजेश पाटील, जयंत आसगांवकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजसिंह चव्हाण, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व रमेश जाधव आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बैठकीत राज्यभरात करण्यात येणार्या विविध उपक्रमांबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली. यंदाचे लोकराजा राजर्षी शाहू स्मृती शताब्दी वर्ष आहे तर 2024 हे शत्तकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्याची संधी आहे. त्यानूसार नागरिकांकडूनही सूचना मागवण्यात येतील, असेही यावेळी सांगण्यात आले.