कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी रिक्षा संघटना आक्रमक बनल्या असून सोमवारी राज्यव्यापी ‘रिक्षा बंद’ची हाक दिली आहे. सोमवारी सकाळी प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना निवेदन देऊन गार्हाणे मांडण्यात येणार आहेत.
राज्यातील रिक्षा व्यवसायासमोर निर्माण झालेल्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यावर एकत्रितपणे तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील रिक्षा संघटनांची बैठक नुकतीच आळंदी देवाची (जि. पुणे) झाली. या बैठकीत रिक्षा व्यावसायिकांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करून आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार सोमवारी रिक्षा बंद ठेवण्यात येणार आहेत.
ई-बाईक टॅक्सी ॲपमुळे पारंपरिक रिक्षा व्यवसायासमोर निर्माण झालेले आव्हान, ऑटोमॅटिक टेस्टिंग स्टेशनमुळे व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या अडचणी तसेच ई-रिक्षांसाठी परमिट सक्तीचे करा, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी रिक्षा बंद आंदोलन केले जाणार आहे. सोमवारी रिक्षा व्यवसाय बंद ठेवून प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात सुमारे १५ ते १६ हजार तर कोल्हापूर शहरात सुमारे सात ते आठ हजार रिक्षा आहेत. रिक्षा व्यवसायावर जिल्ह्यातील सुमारे २० ते २५ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे रिक्षा व्यवसायावरील संकटावर तोडगा काढण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. स्वयंचलित मशिनद्वारे रिक्षांची पासिंग चाचणी, रॅपिडो बाईक टॅक्सीला परवानगी देऊन मोडीत काढण्याचे कारस्थान केले जात आहे. त्यामुळे रिक्षा व्यवसाय वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व रिक्षा चालकांनी रिक्षा बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन चंद्रकांत भोसले यांनी केले.