बाळूमामा देवस्थान 
कोल्हापूर

Balumama temple : बाळूमामा देवस्थानचे दफ्तर ताब्यात घेणार

खडके, कोणकेरींच्या बँक खात्यांची होणार पडताळणी; पोलिस उपअधीक्षक पत्की

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आदमापूर (ता. भुदरगड) येथील संत बाळूमामा देवस्थान समितीमधील ६० कोटी ७५ लाखांच्या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन विश्वस्त मंडळाचीही चौकशी होणार आहे. याचसोबत देवस्थान समितीचे दफ्तरही आर्थिक गुन्हे अन्वेषणकडून ताब्यात घेण्यात येणार आहे. बुधवारी (दि. २२) आदमापूर येथील देवस्थान कार्यालयात जाऊन सर्व व्यवहारांची माहिती घेतली जाणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांनी सांगितले.

बाळूमामा देवस्थानच्या उत्पन्नामध्ये भर घालणारे बकरी विक्री प्रकरण ४१ कोटी, तसेच जागा खरेदी-विक्री प्रकरण १९ कोटी असा एकूण ६० कोटी रुपयांचा घोटाळा सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी तत्कालीन धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके व संत बाळूमामा देवस्थानाचे सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह तत्कालीन विश्वस्त मंडळ, व्यापारी, कंत्राटदारांवर गुन्हा दाखल झाला. मार्च २०२० ते मार्च २०२६ कालावधीतील देवस्थान समिती व्यवहारांत फेराफार झाले असून, बकरी विक्रीतील तसेच जमीन खरेदी-विक्रीमध्येही अनियमितता असल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. या काळातील सर्वच व्यवहार पुन्हा तपासण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. यासाठी देवस्थान कार्यालयातून कागदपत्रेही ताब्यात घेणार आहेत.

या गैरव्यवहारप्रकरणी तत्कालीन प्रशासक आणि धर्मादाय निरीक्षक रागिणी खडके, देवस्थान सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्या बॅंक खात्यांसह देवस्थानच्या सर्व बॅंक खात्यांची माहिती संकलित केली जात आहे. या बँक खात्यांची पडताळणी केली जाणार आहे.

कंत्राटदार, विश्वस्तही चौकशीच्या फेऱ्यात

संत बाळूमामा देवस्थान समितीचे कंत्राटदार, विश्वस्तही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. २०२० ते २०२६ या काळातील सर्व व्यवहारांची पडताळणी करण्यात येणार आहे. या काळात निघालेल्या निविदा त्यांचे कंत्राटदार यामध्ये काही अनियमितता आहे काय, याचीही खातरजमा केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT