कोल्हापूर : उमेदवारी नाकारल्याचा राग मनात ठेवत त्याचा वचपा काढण्याची तयारी सध्या तरी बंडखोरांनी सुरू केली आहे. त्यासाठी त्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत. कोल्हापूर उत्तरला उमेदवारी नाकारलेल्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री जाधव यांनी थेट शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. थेट पक्षांतर्गत नसले तरी गाठीभेटी घेऊन ज्यांनी उमेदवारी नाकारली, त्यांचा वचपा काढण्याची तयारी बंडखोर करीत आहेत. आता बंडखोर मते घेऊन ताकद दाखविणार की नेत्यांनी आदेश दिल्यास माघार घेणार याचे चित्र सोमवारी स्पष्ट होईल.
कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीवरून सुरुवातीपासून अडचणी सुरू झाल्या. राजेश लाटकर यांना जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की पक्षावर आली तर ज्यांना उमेदवारी दिली, त्यांच्या विरोधात जयश्री जाधव यांनी बंडाचा झेंडा विरोधी पक्षात जाऊन फडकविला. त्यामुळे काँग्रेसला दुहेरी धक्का बसला.
जिल्ह्यात पाच जागा लढवत जनसुराज्यने आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. करवीर, चंदगडमध्ये मैत्रीपूर्ण लढत, शाहूवाडी आणि हातकणंगलेत महायुतीअंतर्गत जागावाटपात मिळालेल्या जागेवर पक्ष लढत आहे. त्यामुळे करवीर आणि चंदगडला जनसुराज्यचे आव्हान कायम आहे. इचलकरंजीला सुहास जांभळे यांची बंडखोरी माघार घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर चंदगडला भाजपचे शिवाजीराव पाटील यांनी महायुती उमेदवाराला तर विनायक पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दिलेले आव्हान कायम आहे. त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे.
राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला परिवर्तन महाशक्तीमध्ये हातकणंगले आणि शिरोळ हे दोन मतदारसंघ मिळाले असून तेथे त्यांनी माजी आमदार अनुक्रमे डॉ. सुजित मिणचेकर आणि उल्हास पाटील यांना रिंगणात उतरविले आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी परिवर्तन महाशक्तीला पाठिबा द्यावा आणि प्रसंगी या दोन उमेदवारांसाठी एक संयुक्त सभा द्यावी, असा प्रस्ताव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जरांगे यांना पाठविला आहे. त्यावर पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यता आहे.