धीरज बरगे
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मलकापूर (ता. शाहूवाडी) उपसमितीच्या इमारत दुरुस्तीचे काम संथगतीने सुरू आहे. दुरुस्तीच्या कामाचे टेंडर १५ लाखांचे असून ठेकेदाराला समितीने ५ लाख रुपये ॲडव्हान्स दिली आहे; तर गेल्या सहा महिन्यांत यापैकी दोन लाख रुपयांचेच काम झाले असून कामही निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप होत आहे.
बाजार समितीच्या मलकापूर येथील उपसमिती इमारत दुरुस्तीची सात महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबवून एका माजी उपसभापतींच्या नातेवाईकालाच ठेका दिला गेला. इमारतीच्या काही भागातील पत्रे बदलायचे होते. येथील जुने पत्रे काढून तेच पत्रे रंगवून परत बसविल्याचा प्रकार घडला आहे. यामधून नवीन पत्रे बसविले असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला आहे. या प्रकारामुळे समितीची लूट सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उपसमितीचा ठेकेदार एका माजी उपसभापतींचा नातेवाईक असल्याने हे उपसभापतीही सध्या चर्चेत आले आहेत.
नेते लक्ष देणार का?
सहकारी संस्थांना ऊर्जितावस्था देण्याची भाषणे करणार्या एका बड्या नेत्याच्या कार्यकर्त्याकडून हा प्रकार झाला आहे. समितीमधील एक जबाबदार अधिकारीही या नेत्यांशी संबंधित आहे. जादा काम केल्याचे दाखवत संबंधित अधिकार्याने दोन पगार अधिक घेतले आहेत. संबंधित नेते या प्रकाराकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.