कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीत महापुरामुळे जनतेचा आक्रोश होतो. नागरिकांना पुरापासून वाचविण्यासाठी ३२०० कोटींचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे कोल्हापूर, सांगली पूरमुक्त होणार, असा दृढ विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या प्रकल्पातून ४० टीएमसी पाणी दुष्काळी भागात वळविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभेचे सभापती ॲड. राहुल नार्वेकर, खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार अशोक माने, माजी खा. संजय मंडलिक, भाजपचे युवा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्यासह इतर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, कोल्हापूर व सांगली या शहर, जिल्ह्यात किती पाऊस पडला तर कुठपर्यंत पाणी जाते याचा अभ्यास करून ते पाणी कसे वळवावे लागेल याचे मॉडेल तयार केले. त्यावर काम सुरू झाले आहे. या दोन जिल्ह्यांतून ६० ते ७० टीएमसी वाहून जाणाऱ्या पुराच्या पाण्यापैकी सुमारे ४० टीएमसी पाणी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यात कॅनॉलद्वारे, त्यापुढे उजनी आणि तेथून पाईपलाईनद्वारे ते मराठवाड्यात नेण्यात येईल. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीत पूर येणार नाही आणि इतर राज्यांच्या पाण्याला हात न लावता अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला वापरता येईल. त्याचा मराठवाड्याला फायदा होईल.
केशवराव भोसले नाट्यगृह महाराष्ट्राचा मानबिंदू
फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या देदीप्यमान नाट्यपरंपरेत संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचा माेठा इतिहास आहे, पण दुर्दैवाने दोन वर्षांपूर्वी नाट्यगृहाला आग लागली. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्काळ भेट देऊन २५ कोटी रु. निधी जाहीर केला. हे नाट्यगृह कोल्हापूरचे वैभव असून नागरिकांचे त्यावर प्रचंड आहे. त्याचे पुनर्निर्माण आवश्यक होते. महापालिकेसह सर्वांनी चांगले काम केले असून हे नाट्यगृह महाराष्ट्राचा मानबिंदू आहे.
पोलिसांसाठी सर्वात उंच १७ मजली इमारत
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर हे दोघेही कोल्हापूरचे असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे आरोग्य कोल्हापूरच्या हातात असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी सीपीआरमध्ये अत्याधुनिक सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांवर येथे चांगले उपचार होणार आहेत. शाहूकालीन घरांतून पोलिस कर्मचारी राहत होते. त्या घरांचे वारंवार दुरुस्ती करावी लागत होती. त्यामुळे पोलिसांना नवीन घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. आता कोल्हापुरात सर्वात उंच इमारत पोलिसांची १७ मजली आहे. कार्यक्रमात महापौर रूपाराणी निकम यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी आभार मानले.