कोल्हापूर : कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकांच्या निवडणूक प्रचाराचा रविवारी धुरळा उडाला. शनिवारी उमेदवारांना चिन्ह मिळाले, त्यानंतर आजपासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली. सुट्टीची पर्वणी साधत दिवसभर उमेदवारांसह नेत्यांनीही पायाला भिंगरी बांधली होती. कोपरा सभा, प्रचार फेरी, मिसळ पे चर्चा, मॉर्निंग वॉक संवाद अशा उपक्रमांद्वारे नेत्यांनी उमेदवारांचा प्रचार केला.
कोल्हापूर महापालिकेच्या 81 जागांसाठी 325 उमेदवार, तर इचलकरंजी महापालिकेच्या 65 जागांसाठी 230 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या दोन्ही महापालिकांसाठी दि. 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे प्रचारासाठी अवघा 9 दिवसांचा कालावधी असल्याने निवडणूक रिंगणातील उमेदवारांना शनिवारी चिन्ह मिळताच, आजच्या दुसऱ्याच दिवशी आलेल्या रविवारी नेत्यांसह उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढवला.
कोल्हापूर महापालिकेत सर्वाधिक उमेदवार असलेल्या काँग््रेासचे विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी प्रभाग क्रमांक 19 आणि 20 मध्ये दिवसभर ठिय्या मारला. ठिकठिकाणी कॉर्नर सभा, फेरी आणि वैयक्तिक भेटीगाठी घेत त्यांनी या प्रभागांत प्रचार केला. सुट्टीचा दिवस असल्याची संधी साधत रविवारी त्यांनी हे प्रभाग पिंजून काढले. दोन्ही प्रभागांतील उमेदवारांनी सकाळपासूनच कार्यकर्ते व नागरिकांना एकत्र करून ठिकठिकाणी प्रचार सुरू केला होता. माजी आमदार ॠतुराज पाटील यांनी कसबा बावड्यात प्रचार फेरी काढली.
भाजपचे ज्येष्ठ नेते, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रविवारी कोल्हापूर शहरातील विविध भागांत पदयात्रा आणि कॉर्नर सभा घेतल्या. पाटील यांनी रविवारी सकाळी जरगनगर परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रा. जयंत पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहरातील राजारामपुरी, शिवाजी पेठ आणि सुभाषनगर, जवाहरनगर परिसरात कॉर्नर सभा घेतल्या.
महायुतीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग््रेास पक्षाने रविवारी कोल्हापुरात प्रचार सभा, बैठका टाळत घर टू घर प्रचार करण्यावर भर दिला. पक्षाचे 15 हून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यांनी आपापल्या प्रभागांत रॅली काढल्या, पक्षाचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी त्यांच्या प्रभागात रॅली काढत प्रचार केला. अन्य प्रभागांतील उमेदवारांनी ठिकठिकाणी रविवारचा दिवस गाठून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.
जनसुराज्य शक्ती, रिपब्लिकन पार्टी आणि मित्रपक्षांनीही आघाडी करत कोल्हापूर महापालिकेसाठी शड्डू ठोकला आहे. पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रभागातून उमेदवारांसाठी रॅली काढण्यावर भर दिला. महिला कार्यकर्त्यांसह आघाडीच्या उमेदवारांसाठी ठिकठिकाणी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. त्याद्वारे घर टू घर जात थेट मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
महायुतीचा मुख्य घटक असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांसाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी ठिकठिकाणी कोपरा सभा घेतल्या. रविवारी सकाळी पाच ठिकाणी ‘मिसळ पे चर्चा’ या उपक्रमाद्वारे मतदारांशी संवाद साधला. काही प्रभागांत त्यांनी पदयात्राही काढली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शहरप्रमुख शिवाजी जाधव, युवा सेनेचे सचिव ॠतुराज क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी राजारामपुरीत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी राजारामपुरीतून प्रचार फेरी काढण्यात आली. शिवसेनेचे उपनेते संजय पवार, माजी आमदार मालोजीराजे, सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे आदी उपस्थित होते. सकाळी विविध प्रभागांत ‘मिसळ पे चर्चा’ हा कार्यक्रम घेत मतदारांशी संवाद साधला.
निवडणुकीत तिसऱ्या आघाडीची मोट बांधत आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेल्या राजर्षी शाहू आघाडीच्या नेत्यांनीही रविवारी प्रचाराचा धडाका लावला. राष्ट्रवादी काँग््रेास शरद पवार पक्षाच्या नेत्यांनी स्थानिक भागातील उमेदवाराच्या प्रचारात सहभाग घेतला. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी प्रभाग क्रमांक 20 व प्रभाग क्रमांक 4 येथील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ केला. टेंबलाईवाडी येथे ज्येष्ठ नागरिक संघाची बैठक घेतली. वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी प्रभाग क्रमांक 4, 13, 18 मधील उमेदवारांच्या प्रचाराचा आढावा घेतला. दरम्यान, आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवार, दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता यल्लम्मा मंदिर येथून होणार आहे.
इचलकरंजी : प्रचाराचा फुटला नारळ; इचलकरंजीत गाठीभेटींना वेग
चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत असलेल्या महापालिका निवडणुकीसाठी रविवारी प्रचाराचा नारळ फुटला. सर्वच पक्षीय नेत्यांसह उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी दिवसभर गाठीभेटी, संपर्क मोहीम कार्यक्रम राबवत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष संवादावर यंदा विशेष भर असल्याचे प्रकर्षाने जाणवत होते. रविवार असल्याने शहरात प्रचाराची राळ उठली होती.
शहरातील विविध प्रभागांत सकाळपासूनच पदयात्रा, प्रचार फेऱ्या आणि बैठका यामुळे राजकीय वातावरण तापले होते. काही प्रभागांत चहापान कार्यक्रम, तर काही ठिकाणी कुटुंबीय पातळीवरील भेटींतून संवाद साधण्यात आला. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या उपस्थितीत शहापूर येथे झाला. माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी प्रभाग क्रमांक 16 मध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. अशोक स्वामी, तसेच माजी नगराध्यक्ष अलका स्वामी यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील उमेदवारांनी मोठी पदयात्रा काढली. शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र माने यांच्या उपस्थितीत संवाद बैठक पार पडली.
माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी गणेशनगर परिसरात पदयात्रा काढत प्रचार केला. राष्ट्रवादी काँग््रेासचे शहराध्यक्ष सुहास जांभळे यांनी कृष्णानगर येथे भेटीगाठी घेतल्या. ‘आप’ आणि बहुजन वंचित आघाडींच्या परिवर्तन आघाडीतर्फे भागाभागांत प्रचार फेऱ्या काढण्यात आल्या. शिव-शाहू विकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ वेताळ पेठ येथे करण्यात आला. काँग््रेास कमिटी कार्यालयात आघाडीच्या सर्व उमेदवारांची विशेष बैठक झाली. यावेळी प्रचाराचे मार्गदर्शन आणि सूचना देण्यात आल्या. प्रभाग क्रमांक 9 येथे माजी आ. राजू आवळे आणि माजी आ. राजीव आवळे काँग््रेास शहराध्यक्ष संजय कांबळे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा प्रारंभ झाला. अपक्ष उमेदवारांनीही घरोघरी भेट देत आपली ओळख मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला. शिवसेना ‘उबाठा’ पक्षाच्या उमेदवारांची संपर्क मोहीम आज विविध भागांत सुरू होती. आगामी काही दिवसांत प्रचाराला आणखी वेग मिळणार असून, नेत्यांच्या सभा ही गाजणार आहेत.