कोल्हापूर : ‘अमेरिकन मिशन बंगलो’ नावाने परिचित असलेल्या शहरातील ई वॉर्ड येथील सि.स.नं. २५९/अ मधील सर्व जमिनींचा लवकरच ताबा घेतला जाणार आहे. या जागेवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आवश्यक प्रक्रियेबाबत बुधवारी (दि. २) पहिली बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सि.स.नं. २५९/अ मधील २,२४,०३५.९० चौ.मी. (सुमारे ५५ एकर) क्षेत्रापैकी टेलिकॉम डिस्ट्रिक्ट मॅनेजर व शैक्षणिक संस्थांचे ३१,९२८.०० चौ.मी. क्षेत्र वगळून, उर्वरित १,९२,१०७.९० चौ.मी. क्षेत्राला दि. २७ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार, प्रॉपर्टी कार्डवर ‘महाराष्ट्र शासन’ असे नाव लागले आहे.
या आदेशाद्वारे या मिळकतीवर ‘क’ सत्ताप्रकाराच्या (खासगी मालकीच्या) आधारे करण्यात आलेले सर्व फेरफार, खरेदी-विक्रीचे दस्तऐवज, कुळ, भाडेपट्टा नोंदी व विकास मंजुऱ्या कायदेशीरदृष्ट्या निष्प्रभ व रद्दबातल करण्यात आल्या. यामुळे सुमारे ४९१ कोटी २ लाख ७७ हजार ९२४ रुपये मूल्य असलेली ही जमीन आता पूर्णपणे शासनाच्या मालकीची झाली आहे.
ही जागा आता शासनाच्या मालकीची झाल्याने करवीर तहसीलदार व नगर भूमापन अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी, करवीर यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण क्षेत्राचा प्रत्यक्ष ताबा घेऊन पंचनामा करावा व शासकीय मालमत्तेचा फलक तत्काळ लावावा. ताबा घेत असताना टेलिकॉम डिस्ट्रीकट मॅनेजर, कोल्हापूर शैक्षणिक संस्था असलेले क्षेत्र वगळावे, असेही आदेश दिले आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष जागेचा ताबा घेण्याची कार्यवाही लवकर होईल. बुधवारी प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या बैठकीत याबाबतची कालबद्धता निश्चित होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले. जागा ताब्यात घेऊन त्याठिकाणी राज्य शासनाचा फलकही लावण्यात येणार आहे.