कोल्हापूर : गेल्या दोन दिवसांपासून सूर्यास्ताच्या प्रखर किरणांमुळे करवीर निवासिनी अंबाबाईचा किरणोत्सव सोहळा पूर्ण होत होता; मात्र हवेतील वाढते बाष्प आणि ढगांचा अडथळा यामुळे मंगळवारी अंबाबाईच्या किरणोत्सवात खंड पडला. दक्षिणायन किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी मावळतीची किरणे देवीच्या मुखापर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा असताना किरणे देवीच्या कमरेपर्यंतच पोहोचली. किरणोत्सव पूर्ण न झाल्याने भाविकांची निराशा झाली.
मंगळवारी किरणोत्सवाचा अखेरचा दिवस असल्याने भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र ढगांच्या अडथळ्यांमुळे किरणांची प्रखरता मंदावली होती. सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी अंबाबाईच्या हातातील म्हाळुंगापर्यंत किरणे पोहोचली आणि खाली झुकली.
किरणोत्सव पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
सध्या अंबाबाई मंदिरात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. किरणोत्सवाचे वैशिष्ट्य समजताच अनेक भाविक किरणोत्सव पाहण्यासाठी मंदिरात थांबले होते. काही पर्यटक गणपती चौकात उभे होते, तर काही पर्यटकांनी परिसरातील स्क्रीनवर किरणोत्सव सोहळा पाहिला. यावेळी किरणांचा गाभाऱ्याच्या दिशेने होणारा प्रवास मोबाईल फोनमध्ये कैद केला.