अनिल देशमुख
कोल्हापूर : श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यासाठी परिसरातील जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. परिसरातील मिळकतींचे मूल्यांकन करण्यासाठी ‘क्षेत्रीय तपासणी व मूल्यांकन समिती’ स्थापन करण्यात आली असून ती 28 एप्रिलपर्यंत अहवाल देणार आहे. त्यामुळे मे महिन्यापासून प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कार्यवाहीला गती येणार आहे.
राज्य शासनाने 1445 कोटी 95 लाख रुपयांच्या अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्याला मान्यता दिली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 143 कोटींच्या कामांना प्रारंभ झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात मंदिर परिसरातील कामांसाठी भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादन प्रक्रिया पारदर्शक आणि अचूक होण्यासाठी करवीर प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यीय ‘क्षेत्रीय तपासणी व मूल्यांकन समिती’ स्थापन केली आहे. मंदिराची पूर्व बाजू - भाऊसिंगजी रोडपर्यंतच्या सर्व मिळकती. पश्चिम बाजू - महाद्वार रोडच्या दोन्हीकडील बाजू. दक्षिण बाजू - विद्यापीठ हायस्कूल, वाडीकर भवन, राजाज्ञा वाडा. उत्तर बाजू - जोतिबा रोडपर्यंत.
संपादित जागेवर या सुविधा होणार
मंदिराच्या भोवतालचे काही क्षेत्र संपादित केले जाणार आहे. समिती हे नेमके क्षेत्र निश्चित करणार आहे. त्यानंतरही या क्षेत्रात कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. या संपादित जागेवर पूर्व बाजूला दर्शन मंडप, अन्नछत्र, पश्चिम बाजूला भाविकांसाठी पायाभूत सुविधा, दक्षिण बाजूला विविध सुविधा उभारल्या जाणार आहेत. भूसंपादनासाठी 780 कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
समिती करणार हे काम
प्रस्तावित क्षेत्रातील सर्व सर्व्हे नंबर,
त्याच्या सर्व क्षेत्राची अचूक यादी करणे.
फेरफारनुसार मूळ मालक व इतर हक्कातील व्यक्तींची माहिती संकलन.
जमिनीवरील सध्याची स्थिती काय याच्या नोंदी घेणे.
जमिनीवरील विहिरी, बोअरवेल, घरे, झाडे यांची मोजणी, सविस्तर वर्णन नोंदवणे.
संबंधित क्षेत्राचे मागील तीन वर्षांचे खरेदी-विक्री व्यवहार तपासणे.
चालू रेडीरेकनरनुसार जागांचे प्राथमिक मूल्यांकन करणे.
सर्व माहिती एकत्र करून, नकाशासह संयुक्त मोजणी अहवाल सादर करणे.