अंबाबाई मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग झाला बॅरिकेडस्‌मुक्त 
कोल्हापूर

Ambabai Temple : अंबाबाई मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग झाला बॅरिकेडस्‌मुक्त

अडथळे दूर; श्रीपूजकांसह भाविकांना दिलासा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील प्रदक्षिणा मार्गावर उभारण्यात आलेले बॅरिकेडस्‌ पोलिस प्रशासनाने मंगळवारी हटविले. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गैरसोयीचा सामना करणाऱ्या भाविकांनी सुटकेचा निःश्वास सोडत समाधान व्यक्त केले. बॅरिकेडस्‌मुळे भाविकांसह धार्मिक विधींसाठी उत्सवमूर्ती नेणाऱ्या श्रीपूजकांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागला होता.

नवरात्रौत्सवासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत प्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेडस्‌ लावल्याने भाविकांना मुखदर्शनासाठी जाण्याचा मार्ग शोधण्यापासून अन्य मंदिरांचे दर्शन घेण्यापर्यंत अडचणी येत होत्या. विद्यापीठ हायस्कूल मार्गावरील शनी मंदिरालगत, तसेच दत्त मंदिराकडून रामाच्या पाराकडे जाताना नवग्रह मंदिरासमोर बॅरिकेडस्‌ लावण्यात आले होते. त्यामुळे प्रदक्षिणेसाठी वळसा घालावा लागत होता. लाडू प्रसाद केंद्रावर जाण्यासाठीही अडथळे येत होते. याबाबत भाविकांकडून दोन दिवसांपासून तक्रारी होत होत्या. हिंदू जनसंघर्ष समितीनेही सोमवारी बॅरिकेडस्‌ हटविण्याची मागणी केली होती. अखेर मंगळवारी बॅरिकेडस्‌ हटविल्याने प्रदक्षिणा मार्ग मोकळा झाला.

बॅरिकेडस्‌चा श्रीपूजकांनाही फटका

सोमवारी पहाटे धार्मिक विधीसाठी अंबाबाईची उत्सवमूर्ती घेऊन जाणाऱ्या श्रीपूजकांना पोलिसांनी मार्गातच अडविल्याने पोलिस आणि श्रीपूजक यांच्यात मोठा वाद झाला होता. धार्मिक विधींच्या पारंपरिक प्रक्रियेतही बॅरिकेडस्‌चा अडथळा होत असल्याची नाराजी श्रीपूजकांनी व्यक्त केली होती. धार्मिक प्रथा-परंपरा पार पाडताना प्रशासनाने आडकाठी आणू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT